मिशन ऑल आऊटमध्ये गुन्हेगारांची झाडाझडती

ठाणे : पोलिस आयुक्तालयाने या पार्श्वभूमीवर मिशन ऑल आऊट सुरू केले असून एका रात्रीत मोठी कारवाई करत हिस्ट्रीचिटर, तडीपार, गुंड यांच्यासह हत्यारे बाळगणार्‍या शेकडो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींची झाडाझडती घेतली आहे. इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे. या कारवाईतून हॉटेल, बार, लॉजचालकही सुटलेले नाहीत.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे नऊ दिवस उरले आहेत. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असली तरी शेकडो अपक्ष आणि छोटेमोठे पक्षही जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आपल्या विजयासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते झटत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. मात्र निवडणुका केवळ प्रचार फेर्‍या आणि सभांच्या आधारे जिंकता येत नाही. मतदारांचे फिक्स पॉकेट तयार ठेवावे लागत असल्याने शेवटच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होतो. हा आतापर्यंच्या सर्वच निवडणुकांचा छुपा अनुभव आहे. याच काळामध्ये राजकीय हाणामार्‍यानाही ऊत येतो. पैशांचा पाऊस आणि मद्याचा पूर वाहत असल्यामुळे गुन्हेगारी कारवाया सक्रीय होतात. अशा प्रवृत्तीचा लगाम घालण्यासाठी निवडणूक भरारी पथकासह ठाणे पोलिस आयुक्तालयही सजक झाले आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ एक ते पाच अंतर्गत ९ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून ते १० नोव्हेबरच्या पहाटे २ वाजेपर्यंत ऑपरेशन ऑल आऊट मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक शाखामधील ३१२ पोलिस अधिकारी व तब्बल १,२८८ अंमलदारांचा फौजफाटा सहभागी झाला होता. पाचही परिमंडळामध्ये एकाच वेळी सुरू झालेल्या धडक कारवाईत पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत सुमारे एक लाख ८५ हजार २२० रुपयांचा अवैध शस्त्रसाठा, पाच लाख ७,४८४ रुपयांची अवैध दारू असा एकूण सहा लाख ९२,७०४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ७४ हॉटेल्स, ६४ लॉज, ३९ बिअर बार, ४२ डान्सबारवर छापेमारी करत झाडाझडती घेण्यात आली. दुसरीकडे गावठीसह अवैध दारू, तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ जप्त करत आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी शस्त्रांचा मोठा साठाही जप्त करण्यात यश आले.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी कारवाया करणार्‍यांना चांगलाच चाप बसला असून यापुढेही अशी मोहिम राबवणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

शस्त्र अधिनियम अंतर्गत ३१ गावठी कट्टे, सात कोयते, पाच तलवारी इत्यादी ४३ हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. या गुन्ह्याअंतर्गत ४१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रेकॉर्डवरील ५९ हिस्ट्रीशिटर, ५० तडीपार, ३१ गुंड अशा एकूण १४० सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी ४७ तडीपार गुंड राजरोसपणे फिरताना आढळून आले. त्यांच्यावर संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली.