शहापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील यांची पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती केल्याने प्रकाश पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे असतांना ते शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते.
निष्ठावंत शिवसैनिकापासून शाखाप्रमुख,उपजिल्हाप्रमुख व 20 वर्षाच्या आसपास शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड केली होती. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये सात वर्ष गटनेतेपदी काम केले आहे. 1995 साली खांडपे-चिंचवली ग्रापचे सरपंच होते. ठाणे जिल्ह्यातील खेड्यापाड्यात शिवसेना वाढविण्याचे काम त्यांनी केले असून तळागाळातील शिवसैनिकांसाठी कायम मदतीचा हात देत असल्याने असंख्य शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवुन माझ्यावर पक्षाची मोठी जबाबदारी टाकली असून, ती जबाबदारी मी प्रामाणिक पणे पक्षाची ध्येय धोरणे राबविण्यासाठी व पक्षवाढीसाठी पार पाडेन, असे यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नेते प्रकाश पाटील यांनी सांगितले.