स्ट्रोकची लक्षणे ओळखा आणि त्वरीत उपचार करा

स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे ज्यात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. वेळीच निदान व उपचार केल्यास एखाद्याचा अमूल्य जीव वाचवता येतो. संपूर्ण भारतात स्ट्रोकच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पक्षाघातामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे.

 

जेव्हा मेंदूच्या एका भागाला ऑक्सिजन-समृद्ध रक्ताचा पुरवठा अचानक बंद होतो किंवा कमी होतो तेव्हा स्ट्रोक होतो. हे मेंदूच्या ऊतींना महत्वाची कार्ये करण्यासाठी पुरेसे ऑक्सिजन आणि पोषकतत्व मिळण्यापासून प्रतिबंधित करते. हे एखाद्याच्या मेंदूला गंभीरपणे नुकसान करू शकते आणि त्याच्या/तिच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. स्ट्रोकशी संबंधित लक्षणे वेळीच ओळखल्यास वेळीच उपचार करता येऊ शकतात. यामुळे सकारात्मक परिणामांची शक्यता वाढते आणि भविष्यातील नुकसान कमी करते.

 

सांकेतिक भाषेत स्ट्रोकच्या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. याचा अर्थ (बॅलन्स – संतुलन कमी होणे, आईज- दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, फेस- चेहऱ्याचा काही भाग क्षीण होणे, आर्म- हात कमकुवत होणे, स्पीच- बोलण्यात अडचणी आणि टाईम- वेळ)

 

B- बॅलन्स (Balance) – स्ट्रोकपीडित व्यक्तीच्या शरीरावरील संतुलन बिघडते. तो नीट बसू शकत नाही आणि उभा राहू शकत नाही.

 

E- आईज (Eyes) – स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला अचानक एका डोळ्यात किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये अंधुक दृष्टी येऊ लागली तर समजून घ्या की ही स्थिती स्ट्रोकशी संबंधित असू शकते.

 

F-फेस (Face) – स्ट्रोकमध्ये चेहरा एका बाजूला तिरकस होतो. यामध्ये त्या व्यक्तीला हसूही येत नाही किंवा चेहरा सरळ दिसत नाही असे घडते.

 

A-आर्म्स (Arms)- स्ट्रोकमध्ये हात सैल होतात आणि त्यांची क्रिया नीट होत नाही. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर हातात जीव राहत नाही.

 

S-स्पीक (Speak)- स्ट्रोकमध्ये पीडित व्यक्तीला बोलण्यात अडचण येते, त्याची जीभ अडखळू लागते.

 

T- टाइम (Time)- स्ट्रोकमध्ये वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पक्षाघाताचा झटका आल्यास, वेळ न घालवता, रुग्णाला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जा, शक्यतो चांगल्या सुविधा असलेल्या रुग्णालयात घेऊन जा. जिथे एमआरआय, सीटी स्कॅन आणि उत्तम आयसीयू सुविधा आहेत.

 

डॉ. निर्मल सूर्या

न्यूरोफिजिशियन आणि आयएसए (इंडियन स्ट्रोक असोसिएशनचे अध्यक्ष)