द्वेष गाडायचा असेल तर तुतारी हाच एकमेव पर्याय – खा. संजय सिंह

ठाणे: भाजप हा पक्ष फक्त द्वेषाचे राजकारण करीत आहे. धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या द्वेषाचे राजकारण आता मुंब्र्यात आणले जात आहे अन् त्या राजकारणाला गाडायचे असेल तर तुतारी हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन आपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय सिंह यांनी केले.
महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार, आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंह यांनी मुंब्रा येथील अलमास काॅलनी आणि तन्वीर नगर येथे सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.
संजय सिंह पुढे म्हणाले की, येथे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपले ठाम मत झाले आहे की त्यांचा विजय एक लाख मतांनीच होणार आहे. आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी
येण्याची दोन कारणे आहेत: पहिले म्हणजे, डाॅ.जितेंद्र आव्हाड हे दुसर्‍याचे दुःख पाहून त्याच्या दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व आहे. मी जेव्हा मोदींच्या हुकूमशाहीविरोधात बोललो तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आले. त्याप्रसंगी दिल्लीत माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते आणि दुसरे कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरविणाऱ्या भाजपविरोधात लढतो, त्याच्या सोबत उभे राहण्यासाठी मी नेहमीच सज्ज असतो. जितेंद्र आव्हाड हे द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत आहेत. म्हणूनच मी इथे आलो आहे.
वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याची भाषा देशाचे विधी मंत्री करीत आहेत. पण, जेपीसीसमोर हा विषय चर्चेला आता आला आहे. 800 पानांच्या अहवालापैकी फक्त 100 पाने वाचून झाली आहेत. त्याआधीच जर कायदा करण्याची भाषा केली जात असेल तर ते संविधानविरोधी कृत्य आहे. हे सरकार संविधानाशी आणि लोकशाहीशी गद्दारी करीत आहेत. आजची स्थिती अशी आहे की, “वतन की हालत सुनायेंगे तो पत्थर भी रोऐंगे” हे शिंदे सरकार नको त्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे. माझे म्हणणे आहे की त्यांनी कधी तरी शिक्षण, रोजगार, महागाई, महिला अत्याचार यावर बोलावे, असे आवाहन सिंह यांनी केले.
दरम्यान, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत. असहिष्णुतेची परंपरा आपल्या महाराष्ट्रात वाढीस लागली आहे. ती गाडण्यासाठी आपणाला लढावे लागणार आहे. काल परवा केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून गेले. धर्मद्वेषाचे राजकारण हे सरकार उघड्या डोळ्याने पहात आहे. द्वेषाचे राजकारण करून आपण विजयी होऊ असे त्यांना वाटत असले तरी आपण ते होऊ द्यायचे नाही. द्वेषमूलक राजकारण करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रात नक्कीच पराभव होणार आहे, असा विश्वासही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.