शहापूर आणि भिवंडी पश्चिमेत आघाडीत बिघाडी
ठाणे: भिवंडी लोकसभा मतदार संघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली असताना महाविकास आघाडीमध्ये देखील काही आलबेल नाही. शहापूर आणि भिवंडी पश्चिम या मतदारसंघांत आघाडीतील मित्र पक्षांनी बंडखोरी केल्यामुळे आघाडीत बिघाडी झाली आहे.
भिवंडी पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे दयानंद चोरगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे महेश चौगुले यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे विलास पाटील आणि समाजवादी पक्षाचे रियाज आजमी यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात हॅट्रिक करण्यासाठी भाजपचे श्री. चौगुले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मागिल निवडणुकीत श्री. चौगुले यांना ५८,८५७ इतकी मते मिळाली होती. मागिल निवडणुकीत राष्ट्रवादीचे खालिद गुड्डू यांनी बंडखोरी केली होती. त्यांना तब्बल ४३,९५४ मते मिळाली होती. काँग्रेसचे शोएब खान यांना २८,३५९ मते मिळाली होती. बंडखोरीमुळे ही जागा भाजपाच्या पदरात पडली होती. त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे पाटील आणि समाजवादी पक्षाचे श्री. आजमी यांच्या बंडखोरीचा फायदा श्री. चौगुले यांना होण्याची दाट शक्यता आहे.
शहापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. महायुतीने अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे तर महाविकास आघाडीने शरद पवार गटाचे पांडुरंग दरोडा यांच्यावर विश्वास टाकला आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अविनाश शिंगे यांनी बंडखोरी केली आहे. मागिल निवडणुकीत श्री.दरोडा यांना ७६,०५३ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी एकत्रित शिवसेनेचे श्री. बरोरा यांना ६०,९४९ मते मिळाली होती. यावेळी सीपीएम या पक्षाच्या उमेदवाराने दहा हजार मते मिळवली होती. या निवडणुकीत श्री. बरोरा हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे श्री. शिंगे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. त्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे, परंतु ठाकरे गटाच्या उमेदवाराचे मन वळविण्यात या भागातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. अजून तरी श्री.शिंगे यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केला नाही, त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.