‘आप’-उत्तर भारतीय महासंघाचा जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा

ठाणे: कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना सर्वच स्तरातून समर्थन मिळत असून आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने तसेच उत्तर भारतीय महासंघाने जितेंद्र आव्हाड यांना जाहीर समर्थन दिले आहे.

धर्मनिरपेक्षता विचारांचे संरक्षण करण्यात जितेंद्र आव्हाड यांचे मोलाचे योगदान असून यासाठी त्यांना आपला जाहीर पाठिंबा देत असल्याचे आप आणि उत्तर भारतीय महासंघाने स्पष्ट केले आहे.

माजी मंत्री आणि कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेले जितेंद्र आव्हाड यांनी खऱ्या अर्थाने प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना समर्थन देणाऱ्या संस्था आणि नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. विविध ठिकाणी होत असलेल्या चौक सभांना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने देखील जितेंद्र आव्हाड यांना जाहीर समर्थन दिले आहे.

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले,अरविंद केजरीवाल यांची विचारधारेला आपण मानतो. त्यांचे मोहल्ला क्लिनिक,शिक्षण, आरोग्य आणि ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली गेली पाहिजे. ९ नोव्हेंबरला आपचे नेते संजय सिंग मुंब्र्यात येणार आहेत हा शुभ संकेत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

दुसरीकडे उत्तर भारतीय महासंघाने देखील जितेंद्र आव्हाड यांना आपला पाठिंबा दिला असून उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष करीम खान यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे. करीम खान म्हणाले, मुंब्र्यात ६० टक्के उत्तर भारतीय समाज आहे. आज एक धर्मनिरपेक्ष नेता आहे जो या विचारांची लढाई लढत आहे. ही लढाई धर्मनिरपेक्ष विचार वाचवण्याची असून यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जाहीर समर्थन देत असल्याचे करीम खान यांनी सांगितले.