७२ लाख मतदार ठरवणार २४४ उमेदवारांचे नशीब

दोन लाख २२ हजार नव्याने मतदार वाढले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील १८ मतदार संघातील २४४ उमेदवारांचे भवितव्य ७२ लाख २९,३३९ मतदारांच्या हातात असणार आहे. दरम्यान जिल्ह्यात दोन लाख २२ हजार मतदार नव्याने वाढले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ३३४ उमेदवारी अर्ज वैध ठरले आणि ९०जणांनी माघार घेतल्याने २४४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात जास्त २४ उमेदवार कल्याण पश्चिम मतदार संघात तर सर्वात कमी सात उमेदवार हे भिवंडी ग्रामीणमध्ये आहेत. ठाणे, डोंबिवली, कोपरी-पाचपाखाडी, शहापूर, मुरबाड ९ पर्यंत उमेदवार आहेत.

ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत मतदारांची संख्या दोन लाख २२ हजारांनी वाढल्याने मतदारांचा आकडा ७२ लाख २९,३३९ झाला आहे. सर्वाधिक पाच लाख ४५ हजार मतदार हे ओवळा-माजिवडा मतदार संघात असून सर्वात कमी दोन लाख ८३,३९७ मतदार संख्या ही उल्हासनगर विधानसभा मतदार संघात आहे. जिल्ह्यात ३८ लाख ४५,०४२ पुरुष आणि ३३ लाख ८२,८८२ स्त्री मतदार असून १६०३ तृतीपंथी मतदार आहेत. तृतीयपंथीय मतदारांची सर्वाधिक नोंदणी केल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे कौतुक केले आहे.

५६ हजार ९७६ मतदार हे ८५ वर्षावरील असून ३८,१४९ दिव्यांग मतदार आणि एक लाख ७२,९८१ हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, अशी माहिती शिनगारे यांनी दिली.

जिल्ह्यात निवडणूक सुरळीत पार पडावी याकरिता ६,९५५ मतदान केंद्र सज्ज असून गृहनिर्माण सोसायटीमध्ये ३३७ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक युवक, एक महिला आणि एक दिव्यांग कर्मचाऱ्यांमार्फत मतदान केंद्र चालविले जाणार आहे. सर्वाधिक ५१८ मतदान केंद्र हे मुरबाड आणि २६० मतदान केंद्र हे उल्हासनगरमध्ये आहेत. मुबलक प्रमाणात वोटिंग मशीन उपलब्ध असून ३०,८६८ निवडणूक कर्मचारी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील ५,३७८ मतदान केंद्र आणि ग्रामीण भागातील ६५९ मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा असणार आहे, असे शिनगारे यांनी सांगितले. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. दत्ता शिंदे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, ठाणे पोलीस अधीक्षक डॉ. डी स्वामी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

एक कोटी नागरिक मतदानाचा संकल्प सोडणार
जिल्ह्यातील एक कोटी नागरिक हे १४ नोव्हेंबरला एकाच वेळी सायरन वाजताच मतदानाचा संकल्प सोडणार आहेत. मतदान जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून अशाप्रकारचा उपक्रम राबवण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

१३ कोटींची रोकड, दारू जप्त

भरारी पथकाने केलेल्या कारवाईत १३ कोटी २६ लाख ९६ हजारांची रोकड, दारू जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये आठ कोटी ८२ लाख ५२,८७१ रुपयांची रोकड जप्त झालेली आहे.