भिवंडी पूर्व मतदारसंघात गाडीत सव्वा दोन कोटींची रोकड जप्त

ठाणे : धामणकर नाका येथे सीएमएस या कंपनीची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यात दोन कोटी ३० लक्ष १७,६०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. याबाबत योग्य कागदपत्रे चालकाला सादर करता न आल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांना मे. सीएमएस या कंपनीची रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी (क्र. एमएच ४३/व्हीपी/७९२०) ही सायंकाळी ७:४५च्या सुमारास आढळून आली. संबंधित गाडी चालकास गाडीतील रोख रक्कमेबाबत विचारणा केली असता ही रोकड ही मे. सीएमएस या कंपनीची असल्याचे नमूद केले पण रक्कमेबाबत पुरावे व रोख रक्कम हाताळणी क्युआर कोड सादर करता आला नाही. या कारणास्तव त्यांनी निवडणुक निर्णय अधिकारी श्री. सानप यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यांनी तत्काळ ही माहिती एफएसटी पथक क्र. ६ या विभागात कार्यरत असलेले हेमंत पष्टे यांना कळवली.

पंचनामा करून ही रक्कम जप्त करण्यात आली असून ती भिवंडी कोषागार विभागात जमा करण्यात आली आहे.