जेवणाच्या वादातून हत्या

उल्हासनगर : जेवणाच्या वादातून इसमाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजा शेख असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.

उल्हासनगर कॅम्प तीनमधील काजल पेट्रोल पंपजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मयत राजा इब्राहिम शेख आणि आरोपी हे दोघे जेवणासाठी बसले होते. जेवणावरून वाद होऊन आरोपी याने मयत राजा इब्राहिम शेख याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. लालजी ट्रान्सपोर्ट समोर मृतदेह पडला होता. त्याच्या बाजूला ट्रक असल्याने तो कुणालाही दिसून येत नव्हता. सकाळी ट्रान्सपोर्टचे कार्यालय उघडल्यावर त्यांनी तत्काळ मध्यवर्ती पोलिसांना फोन करून माहिती दिली. तत्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक उमेश सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

घटनास्थळावरील सीसीटव्हीच्या माध्यमातून तत्काळ तपासाची चक्रे फिरवून हत्या करणाऱ्या आरोपीला मध्यवर्तीय पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिकचा तपास करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.