अनधिकृत फलक, पोस्टर्स तत्काळ उतरवणार

ठाणे: निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीशिवाय लागलेले सर्व प्रकारचे दिवाळी शुभेच्छा किंवा त्याप्रकारचे अनधिकृत फलक, पोस्टर्स यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी. काही ठिकाणी त्या फलकांचे सांगाडे (तात्परुत्या फ्रेम) कायम असल्याचे निर्दशनास आले आहेत. फलकांचे सांगाडेही काढण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे सोमवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत फलकांबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करावाई करून सगळे फलक, पोस्टर्स काढून घेण्यात आले होते. आता दिवाळीचे दिवस असल्याने पुन्हा एकवार शुभेच्छांसाठी फलक लावले जाण्याची शक्यता आहे. ज्या फलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी असेल, त्यांनाच असे शुभेच्छा फलक लावता येतील, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी बैठकीतील सादरीकरणाचे संचालन केले.

मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून मतदारांसाठी आवश्यक तेथे रॅम्प, शौचालय सफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचे नियोजन करावे. मतदारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आयुक्त राव यांनी सांगितले.

दिवाळीची सुटी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. त्याचबरोबर, बांधकाम प्रकल्पांच्या परिसरातील रस्ते, चिखल आणि धूळीने भरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. शहर विकास विभागाने सर्व बांधकाम व्यावसायिकांना परिसरातील रस्ते खराब होणार नाहीत, त्यावर वेळोवेळी पाण्याची फवारणी होईल याविषयी पुन्हा सूचना द्याव्यात, असेही आयुक्त राव म्हणाले.