उल्हासनगर: आरपीआयमधून निलंबित, राष्ट्रवादीकडून नकार आणि त्यानंतर थेट मनसेत प्रवेश घेत रिपाइंचे माजी शहराध्यक्ष भगवान भालेराव यांना मनसेकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. या प्रवेशाने मनसेच्या निष्ठावंतांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. भाजपमध्ये विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कलानी कुटुंब आणि भगवान भालेराव हे उमेदवारीच्या प्रतिक्षेत होते. पण शनिवारी भाजपातर्फे विद्यमान आमदार कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या वतीने ओमी कलानी यांची नावे स्पष्ट झाल्यानंतर भगवान भालेराव यांचा राष्ट्रवादीतील उमेदवारीचा मार्ग बंद झाला होता.
राष्ट्रवादीत निराशा पदरी पडल्यानंतरही भगवान भालेराव यांनी हार मानली नाही. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि रविवारी पक्षात प्रवेश केला. प्रवेश करताच भगवान भालेराव यांना विधानसभेची उमेदवारी देखील मिळाली, ज्याने उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भालेराव यांचा हा प्रवेश मनसेसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे.
मनसेसाठी अनेक वर्षं निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते या निर्णयाने चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. उल्हासनगरमध्ये पाच निष्ठावंत कार्यकर्ते, जे विधानसभेच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते, त्यांच्या नावांची चर्चाही सुरु होती. मात्र त्यांना डावलून भगवान भालेराव यांना उमेदवारी देण्यात आल्याने या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. यामुळे पक्षाच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, आणि कार्यकर्त्यांचा रोष उफाळून येत आहे. भगवान भालेराव यांच्या मनसेतील प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली आहेत, मात्र त्याचबरोबर मनसेसाठी एक मोठं आव्हानही निर्माण झाले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा रोष दूर करण्याचे आणि पक्षात एकता राखण्याचे मोठं आव्हान मनसेपुढे उभे राहिले आहे.