डोंबिवली : कोकणचे शक्तीपीठ म्हणून ज्या देवस्थानाची ख्याती आहे, त्या श्री क्षेत्र आंगणेवाडी देवस्थानाला आज भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत भेट दिली. याप्रसंगी चव्हाण यांनी श्री देवी भराडी आईच्या चरणी साकडे घालत प्रचाराचा नारळ फोडला.
यंदा भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून राज्यभरातील प्रचाराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी पक्षाने दिलेली असल्याने, व्यक्तिगत विजयासोबतच महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी आशीर्वाद मागितला. डोंबिवली हा आपला मतदारसंघ आणि राज्यभरातील प्रचार अशी दुहेरी जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला. उमेदवार आणि पक्ष कोण आहे याचा विचार न करता, महायुतीचा धर्म म्हणून आपला प्रत्येक उमेदवार विजयी होईल यासाठी ताकदीने उभे राहायचे, असा सल्ला यावेळी त्यांनी राज्यभरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी राज्य आणि देश अशा दोन्ही पातळीवर एकविचाराचं सरकार असणं गरजेचं आहे. अशा सरकारमुळे होत असलेली राज्याची प्रगती आपण गेल्या अडीच वर्षात अनुभवत आहोत. त्यामुळे प्रत्येक मतदाराने महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीच्या पाठीशी उभे राहिले पाहीजे, असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील मतदारांना केले आहे. भाजप पक्षाने विश्वास टाकत पुन्हा एकदा डोंबिवलीतुन उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून आम्ही सर्व जण महायुतीच्या विजयासाठी जोमाने काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी दिली.
“रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीने आणि ज्या ताकदीने नारायण राणे यांचा विजय झाला, त्याच पद्धतीने आणि ताकदीने तळकोकणात महायुतीचा शतप्रतिशत विजय होईल”, असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आंगणे कुटुंबियांच्या वतीने भास्कर आंगणे, बाळा आंगणे यांनी रविंद्र चव्हाण यांचे स्वागत केले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, छोटू ठाकूर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ललित चव्हाण, राजू परुळेकर, बाबू आंगणे, संतोष कोदे, महेश बागवे, राजन वराडकर, महेश मांजरेकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांच्या या सिंधुदुर्ग भेटीने तळ कोकणातील कार्यकर्त्यांमधून उत्साह दिसून आला.