ठाणे : ठाणे विधानसभेवर हॅटट्रीक करण्यासाठी आमदार संजय केळकर सज्ज झाले आहेत. रविवारी भाजपच्या पहिल्या यादीत आ. संजय केळकर यांची वर्णी लागताच गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या वावड्यांना अखेर पुर्णविराम मिळाला. आ. केळकर यांची उमेदवारी जाहिर होताच महायुतीतर्फे भाजपच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. दरम्यान, पुन्हा ठाण्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने आ. केळकर यांनी शक्तीस्थळावर नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन केले.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ बहुभाषिक असला तरी आ. संजय केळकर हे स्वच्छ प्रतिमेचे सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने २०१४ आणि २०१९ साली भाजपच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आता २०२४ च्या निवडणुकीसाठीही पक्षाने पुन्हा एकदा आ. केळकर यांच्यावरच विश्वास दर्शविल्याने या खेपेला आ. केळकर हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आ. केळकर यांना तिकिट जाहिर होताच रविवारी भाजपच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयाबाहेर भाजप व महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर करीत फुलांचा वर्षाव करून जल्लोष केला.
याप्रसंगी, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघूले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक सुनेश जोशी, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप ठाणे शहर महिला अध्यक्षा स्नेहा पाटील, उपाध्यक्ष महेश कदम, सरचिटणीस विलास साठे, सचिन पाटील, भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाचे पर्व सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी महाराष्ट्रात विकासाचे काम केले आहे. केंद्रात व राज्यात असलेल्या डबल इंजिन सरकारमुळे हे शक्य झाले. तेव्हा अभिनव भारत तसेच विकसित ठाणे घडवायचे असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. ठाण्याची जनता सुज्ञ आहे, सर्वपक्षियांसह ठाणेकरांचे असंख्य हात माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे विजयाची चिंता वाटत नाही, लोकसभेप्रमाणेच ठाण्याचा हा गड महायुतीच जिंकेल, असा विश्वास व्यक्त करून आ. संजय केळकर यांनी, पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व केंद्रीय नेत्यांचे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीचे आभार मानले आहेत.
महाविकास आघाडी ‘वेट अँड वॉच’वर
महाविकास आघाडीच्या जागावाटपात पारंपारिक मतदारसंघ पक्षांना सोडण्यावर भर आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेला कोपरी- पाचपाखाडी येथे दोन शिवसेनेत लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना ही जागा काँग्रेसला सुटू शकते. तर मीरा-भाईंदरची जागाही काँग्रेसच्या पारड्यात आहे जाण्याची शक्यता आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे विद्यमान आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. ठाण्यातून माजी खासदार राजन विचारे यांना शिवसेना ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ओवळा-माजिवाडा येथे प्रताप सरनाईक यांना आव्हान देण्यासाठी नरेश मणेरा यांचे नाव आघाडीवर आहे. कल्याण ग्रामीणमध्ये माजी आमदार सुभाष भोईर यांना संधी मिळेल. भिवंडी पूर्वमधून माजी आमदार रुपेश म्हात्रे, ऐरोली येथे एम. के. मढवी रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. डोंबिवलीत नुकतेच शिंदे गटातून आलेले दिपेश म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत चव्हाण, नाईक, कथोरे, म्हात्रे यांचा समावेश
ठाणे जिल्ह्यात भाजपाने भिवंडी पश्चिम मतदारसंघातून महेश चौघुले, मुरबाड येथून किसन कथोरे, कल्याण पूर्व येथून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, डोंबिवलीमधून मंत्री रवींद्र चव्हाण, ठाणे शहर मतदारसंघातून संजय केळकर, ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक आणि बेलापूरमधून मंदा म्हात्रे या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. उल्हासनगर मतदारसंघातून कुमार आयलानी यांची उमेदवारी अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. तर मीरा-भाईंदर मतदारसंघात आमदार गीता जैन आणि नरेंद्र मेहता यांच्या वादामुळे येथील उमेदवारी प्रतिक्षेत आहे. लवकरच येथे तोडगा निघण्याची शक्यता आहे.
आदर्श मित्र आणि पुत्र
आमदार संजय केळकर कार्यकर्त्यांवर मातेच्या ममतेने प्रेम करतात आणि कार्यालयात काम घेऊन येणाऱ्या नागरिकांवर मायेची पखरण घालतात. याचे मूळ त्यांच्या मातृभक्तीत सापडते, असे कार्यकर्ते सांगतात. लहानपणापासून ते आतापर्यंत त्यांनी जनतेची सेवा करत असताना आईची सावली कधीच सोडली नाही, आता तिसऱ्यांदा भाजपने आमदारकीचे तिकीट दिल्यानंतर ते दिवंगत मित्र स्व.आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन नतमस्तक झालेच पण घरी आईचे आशीर्वादही घेतले. यावेळी आईने त्यांना पेढा भरवून आशीर्वाद दिले. तो क्षण अत्यंत भारावलेला होता, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.