ठाणे पालिका शाळा विषबाधा प्रकरण
ठाणे : दिव्यातील आगासन भागात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ८८ मधील ४४ विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली होती. या घटनेनंतर अत्यवस्थ ४० विद्यार्थ्यांना पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ११ मुलांवर अद्याप उपचार सुरु असून २९ मुलांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कळवा येथील एका खासगी शाळेत ४६ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली होती. या घटनेला १५ दिवस उलटत नाही तोच दिव्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुरुवारी पोषण आहारातून विषबाधा झाली. शाळेत दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत खिचडी दिली. ही खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटात मळमळायला लागले. काहींना चक्कर आली, तर काही विद्यार्थ्यांना उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर या विद्यार्थ्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी २९ विद्यार्थ्यांना शुक्रवारी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर, ११ विद्यार्थ्यांना ताप असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेत पालकांची मनसे आमदार राजू पाटील व माजी आमदार सुभाष भोईर यांनी भेट घेतली. भोईर यांनी या घटनेबाबत शिक्षकांशी चर्चा केली. तसेच पोषण आहार पुरवण्याचे कंत्राट पालिकेने स्थानिकांना देण्याची मागणी भोईर यांनी केली.