कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या दिवाळीत दीड हजार रुपयांची वाढ करीत १९,५०० रूपये सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस पालिका आयुक्तांनी जाहीर केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी १८ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. आगामी विधानसभेच्या निवडणुकीची मंगळवारी सायंकाळी आचारसंहिता लागू झाल्याने येत्या पंधरा दिवसांवर येऊन ठेवलेल्या दिवाळी सणासाठी पालिकेने कर्मचाऱ्यांचा दिवाळी सानुग्रह अनुदानाचा तिढा सुटला नसल्याने दिवाळी सानुग्रह अनुदानाच्या घोषणेकडे सर्वच कर्मचाऱ्याचे लक्ष लागून राहिले होते.
पालिकेच्या सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या सानुग्रह अनुदानाकरीता रक्कम रू.९६३.६१ लक्ष तरतूद असून, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता प्रती अधिकारी कर्मचारी यांना रू.१९,५००/- (अक्षरी रूपये एकोणीस हजार पाचशे मात्र) “सानुग्रह अनुदान” अदा करणेबाबत पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.इंदूराणी जाखड यांनी मान्यता दिली आहे.