फेरनिविदा काढल्याने करावी लागणार प्रतिक्षा
ठाणे: ठाणे परिवहन सेवेत दाखल होणाऱ्या १६० वातानुकूलित बसेस टेंडरमध्ये अडकल्या आहेत. ठेकेदाराच्या आडमुठ्या भूमिकेमुळे प्रशासनाला फेरनिविदा काढावी लागल्याने काही महिने तरी ठाणेकरांना वातानुकूलित बसेसचे वाट पहावी लागणार आहे.
ठाणे परिवहन सेवेचा २०२४-२५ चा ६९४ कोटी ५६ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परिवहन ताफ्यात पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून शून्य उत्सर्जन-प्रदूषण विरहित इलेक्ट्रीक बससह वातानुकुलीत ई बसचा समावेश करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली होती. त्यानुसार ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात १२३ ईलेक्ट्रीक बस दाखल झाल्याने सद्यस्थितीत टीएमटीच्या ४४६ बस प्रवाशांना सेवा देत आहेत. यात वित्त आयोगाच्या निधीतून ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्वावर वातानुकुलित ईलेक्ट्रीक नऊ मीटरच्या १०० बस आणि १२ मीटरच्या ६० बसची खरेदी करण्यात येणार आहे. या १६० वातानुकुलित ई बसच्या खरेदी, संचलन (चालकासह) आणि देखभालीसाठी टीएमटी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र, ठेकेदारांनी जादा दराची अपेक्षा ठेवल्याने परिवहन व्यवस्थापनाने हे प्रस्ताव धुडकावले असून १६० ई बससाठी फेरनिविदा काढली आहे.
ठाण्यात नागरीकरण वाढल्याने दिवसेदिवस वाढत असलेला प्रवासी संख्या लक्षात घेऊन टीएमटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वातानुकुलीत १० डबल डेकर बस दाखल करण्याचे ठरले होते. मात्र, टीएमटी प्रशासनाने याबाबत अद्याप काहीच हालचाली केलेल्या नाहीत. किंबहुना, डबल डेकर बसेस वगळून केवळ १६० ई वातानुकुलित बससाठीच निविदा प्रक्रिया राबवली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान डबल डेकरचा प्रस्ताव तूर्तास बासनात गेला असल्याने ठाणेकरांची डबल डेकर बसमधून फिरण्याची स्वप्ने लांबणीवर गेली आहेत.