ठाण्यातील विनयभंग प्रकरण : शेकडो महिलांचे ठिय्या आंदोलन

ठाणे : विनयभंगाच्या आरोपीला जामीन झालाच कसा ? असा आक्रोश विनयभंग झालेल्या ११ वर्षीय मुलीच्या माता-पित्याने केला आहे. विनयभंग करणारा आरोपी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून या प्रकरणात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली असल्याने पीडित मुलीचे आईवडील आणि महिलांनी संताप व्यक्त केला आहे. मुलीला न्याय मिळावा तसेच आरोपीला तत्काळ आता करा या मागणीसाठी मंगळवारी शासकीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिलांनी ठिय्या आंदोलन केले.

ठाण्याच्या स्टेशन परिसरातील भंडार आळीत राहणारी चिमुकली शुक्रवारी दुपारी ट्युशनला जात होती. यावेळी सचिन यादव (५५) याने त्या मुलीला इमारतीमध्ये गाठत विनयभंग केला. त्यावेळी घाबरलेल्या पीडित तरुणीने त्या नराधमाला लांब ढकलले असता यादव याने अश्लील भाषेत पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य केले. पीडित तरुणीने आपल्या सोबत झालेला प्रकार कुटूंबियांना सांगितला . या घटनेची गंभीर दाखल घेत पीडितेच्या कुटूंबियांनी थेट ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक देखील केली. विशेष म्हणजे विनयभंगासारख्या आरोपीला दुसऱ्या दिवशी जामीन झाल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणी उबाठा पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला पुन्हा अटक करण्याची मागणी केली. तर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या आणि भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले.

नराधम सचिन यादवला तत्काळ अटक करावी. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, तसेच जो कोणी धमक्या देत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे.