प्राथमिक नऊ आरोग्य केंद्रासह १८ संस्थांना कायाकल्प पुरस्कार

ठाणे: केंद्र व राज्यशासनाच्या वतीने रुग्णांना शासकीय रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने कायाकल्प पुरस्कार रुग्णालयांना देण्यात येतो. यावर्षी कायाकल्प पुरस्कारांची घोषणा राज्यस्तरावरून करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ९ संस्थाना व आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र स्तरावर १८ संस्थांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

जिल्हा परिषद येथील सभागृहात आज, १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र प्रमुख यांचा सन्मान करण्यात आला.

कायाकल्प परितोषिक मिळवण्यामध्ये सर्व संस्थांचे सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, प्रशासकीय विभाग व विशेषतः सर्व सफाई कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांचे विशेष अभिनंदन आणि ठाणे जिल्ह्यातील इतर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना विविध पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रेरणास्थान म्हणून पुढील कामकाज करावे असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.स) डॉ. मृणाली राहुड, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रा .आ केंद्र खारबाव यांनी रक्कम रुपये दोन लक्ष पारितोषिक व आयुष्मान आरोग्य मंदिर- उपकेंद्र स्तरावर उपकेंद्र लाप ता.भिवंडी यांनी रक्कम रुपये एक लक्ष पारितोषिक घेऊन जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी, धसई, शेणवा, कसारा, दाभाड, शिरोशी, खडवली, बदलापूर यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रुपये पारितोषिक प्राप्त झाले आहेत. उपकेंद्र स्तरावरील उपकेंद्र सापगाव ता. शहापूर प्रथम उपविजेता ५० हजार रु, उपकेंद्र फळेगाव ता.कल्याण दुसरे उपविजेता ३५ हजार रुपये पारितोषिक घेऊन यशस्वी झाले आहेत. उपकेंद्र भिसोल, ओजीवले, कान्होर, दापोडे, वडूनवघर, पहारे, नडगाव, मानिवली, साने, खांबाला, बोहोनोली, भिणार, कालवर, उसगाव, आमने या उपकेंद्रांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त झाले आहे.