विमान उतरण्याची पाच ठिकाणी सुविधा
सांगली : विमान उतरवण्याची पाच ठिकाणी सुविधा असलेला नवी मुंबई ते बंगळूरू महामार्ग बांधण्याचे ठरविण्यात आले असून, या मार्गाने ८०० किलोमीटर अंतर आठ तासांत पार करता येईल , असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
राष्ट्रीय महामार्गावरील दहिवडी-मायणी-विटा या रस्त्याचे काँक्रीट दुपदरीकरण, चौपदरीकरणासह पुनर्बांधणी व दर्जोन्नतीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण गडकरी यांच्या हस्ते विटा येथे शुक्रवारी करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, माजी आमदार दिलीप येळगावकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, की या नवीन मुंबई-पुणे-बंगळुरू द्रुतगती मार्गाची लांबी ८०० किलोमीटर असणार आहे. सहापदरी असणाऱ्या या महामार्गावर पाच ठिकाणी मार्गावरच मालवाहू विमान उतरण्याची सोय म्हणजेच धावपट्टी बांधण्यात येणार आहे. याद्वारे वाहतूक जलद होऊन त्यावरील खर्चातही बचत होईल. या नव्या मार्गाने नवी मुंबई ते बंगळूरू हे अंतर केवळ आठ तासांत पार करता येईल, असे गडकरी म्हणाले.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील या महामार्गाची लांबी ७४ किलोमीटर आहे. या नवीन द्रुतगती मार्गामुळे दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी मदत होईल. आपण केंद्रीय जलसंधारण मंत्री असताना टेंभू, म्हैसाळ योजनाना मंजुरी देण्याची संधी मिळाल्याचे सांगून या उपसा सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागाचा कायापालट होऊन हिरवं शिवार फुलल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
दहिवडी मायणी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास ६०० किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. सांगली तासगाव बाह्य वळणासही मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे भूसंपादन सुरू झाले आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे कामही लवकरच सुरु होईल, असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले.