एपीएमसी बाजारात भाज्यांच्या दरात ३०टक्के वाढ
नवी मुंबई : मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे भाज्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे उत्पादनाला फटका बसत असून एपीएमसी बाजारात आवक घटली आहे. परिणामी एपीएमसीत टोमॅटो, शिमला मिरची, फ्लॉवरच्या दरात २५ते ३० टक्के वाढ झाली आहे तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो शंभरी गाठली आहे.
पावसामुळे शेतातच माल पडून राहिला आणि त्यांनतर उन्ह पडल्याने शेतमालाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे उत्पादन कमी, शिवाय उत्तम दर्जाच्या भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. फ्लॉवर १८ गाड्या ८२४ क्विंटल तर शिमला मिरची १९ गाड्या ७५४ क्विंटल, टोमॅटो २०-२२ गाड्या १८०० क्विंटल तर हिरवा वाटाणा चार गाड्या १८० क्विंटल आवक झाली आहे. पावसामुळे टोमॅटोच्या पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातून टोमॅटोच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी एपीएमसीत टोमॅटोची आवक निम्यावर येऊन दरात वाढ झाली आहे. टोमॅटो ६० ते ६५ प्रतिकिलोने घाऊक बाजारात विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली आहे. १००-१२० रुपये किलो दराने मिळणारे मटार १३०-१४० रुपयापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ३०-४० रुपये किलोने मिळणारी शिमला मिरची आता ५०-६० रु. किलोने मिळत आहे. याव्यतिरिक्त १४-१५ रुपयांना मिळणारे फ्लॉवर २५ रुपयांनी वाढले आहेत.
भाज्या आता आधी
शिमला मिरची ५०-६० ३०-४०
फ्लॉवर ४० १४-१५
टोमॅटो ६०-६५ ३०-३५
हिरवा वाटाणा१३०-१४० १००-१२०
पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून येणार्या भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे भाज्यांच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याची माहिती घाऊक व्यापारी बाळासाहेब बडदे यांनी दिली.