शरद पवार यांच्या उपस्थितीत हिंदू देव-दैवतांचा अवमान!

ठाण्यात भाजयुमो व युवा सेनेसह हिंदूत्ववादी संघटनांचे आंदोलन

ठाणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी कोट्यवधी हिंदूंचे दैवत प्रभू श्री रामचंद्र व स्वामी समर्थांचा अवमान करणारी वक्तव्ये केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहरात भाजयुमो व युवा सेनेसह वारकरी सांप्रदाय आणि हिंदूत्ववादी संघटनांनी निषेध आंदोलन केले.

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाचे आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, वारकरी सांप्रदायाचे संतोष महाराज राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनात शरद पवार, ज्ञानेश महाराव यांचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडच्या वाशी येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्री रामचंद्र व स्वामी समर्थ यांच्याविरोधात अवामानजनक टीका केली होती. या अधिवेशनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांची या विधानाला मूक संमती होती, असा आरोप करीत ठाण्यात आज रंगो बापूजी गुप्ते चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यात या प्रकाराचा धिक्कार करण्यात आला.

या आंदोलनात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ह. भ. प. संतोष महाराज राठोड, माजी नगरसेवक संदीप लेले, सुनील हंडोरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज दळवी, कैलास म्हात्रे, सचिन केदारी, बाळा केंद्रे, गौरव अंकोला, वृषाली वाघुले आदी सहभागी झाले होते.