बिस्कीट कंपनीत यंत्रात अडकून लहान मुलाचा मृत्यू

अंबरनाथ : घरी सांभाळ करण्यास कोणी नसल्याने आईसोबत बिस्किट कंपनीत आलेल्या लहान मुलाचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली.

आयुष चौहान असे या चिमुकल्याचे नाव असून सांभाळ करायला कुणी नसल्यानं तो कंपनीत कामाला असलेली त्याची आई पूजा चौहान सोबत कंपनीत आला होता.

अंबरनाथ एमआयडीसीत राधेकृष्ण बेकर्स नावाची बिस्कीट कंपनी आहे. या कंपनीत बिहारमधून कामासाठी काही दिवसांपूर्वी पूजा चौहान ही काम करण्यासाठी आली होती. तिचा तीन वर्षांचा मुलगा आयुष याचा घरी सांभाळ करणारे कुणी नसल्याने पूजा ही कामावर येताना मुलालाही सोबत घेऊन येत होती. आज मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पूजा कंपनीत काम करत असताना मुलगा आयुष हा बिस्कीट तयार करणाऱ्या मशीनजवळ गेला आणि एका यंत्राच्या पट्ट्यामध्ये अडकला. यात त्याचा मृत्यू झाला.

यानंतर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुन्हा दाखल केला.