नवी मुंबई : आयुक्तांच्या आदेशाने गुरुवारी मोरबे धरणावर जलपूजन आयोजित केले होते. यावेळी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या समवेत माजी महापौर जयवंत सुतार व सुधाकर सोनवणे हे पूजेचा मान देण्यात आला. आयुक्तांनी एकाच पक्षाला झुकते माप दिल्याचा आरोप करत काँगेस पक्षाने आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणा दिल्या.
मागील वर्षी मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबईचे माजी महापौर तथा माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि इतर माजी नगरसेवक यांनी जलपूजन केले होते. यावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेत येथे महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता व महापालिका प्रशासनाला पूर्वसूचना न देता प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या मोरबे धरणाच्या परिसरात अनधिकृतरीत्या प्रवेश करून जलपूजन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांना खुलासा सादर करण्याची नोटीस देण्यात आली होती. यंदा देखील धरण पूर्ण भरल्याने मनपा आयुक्तांच्या आदेशाने २९ ऑगस्ट रोजी मोरबे धरणस्थळी जलपूजन आयोजित केले होते. मात्र या जलपूनानास आमदार गणेश नाईक यांच्या समवेत त्यांचे समर्थक व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पूजेला आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या समवेत माजी महापौर जयवंत सुतार व सुधाकर सोनवणे हे पूजेला बसले होते. या पूजनाला इतर पक्षाच्या माजी नगरसेवकांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात एकाधिकारशाही सुरू आहे. धरण कुठल्या एका व्यक्तीचे नसून समस्त नवी मुंबईकरांचा आहे. त्यामुळे या एकाधिकारशाही व मनपाच्या वागणुकीचा निषेध करत काँग्रेस पक्षाने आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केली.
यावेळी राज्य युवक उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, प्रवक्ते रवींद्र सावंत, माजी नगरसेवक अंकुश सोनवणे व काँगेस पदाधिकारी उपस्थित होते.