ठामपाचे दोन लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात

ठाणे: जन्मदाखला देण्याकरिता ४०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीमधील रणजित मगदूम (४२) आणि निखील कडव (२४) या दोन्ही लिपिकांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई बुधवारी करण्यात आली असून या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ठाणे एसीबीने दिली.

तक्रारदारांनी त्यांची नात हिचा जन्मदाखला मिळावा, याकरीता त्यांनी दिवा प्रभाग समितीत अर्ज केला होता. त्यानुसार लिपिक रणजित मगदूम यांनी दाखला देण्यासाठी तक्रारदारांकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदारांनी २६ ऑगस्ट २०२४ रोजी ठाणे एसीबी कार्यालयात लेखी तक्रार केली. त्याच्या अनुषंगाने २८ ऑगस्ट २०२४ रोजी पडताळणी कारवाईमध्ये लिपिक रणजित मगदूम यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ४०० रुपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. तसेच ती रक्कम त्यांनी लिपिक निखील कडव यांच्यासाठी स्विकारल्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रगती अडसुरे करत आहेत.