दहीहंडी उत्सवात ठाण्यात २२ गोविंदा जखमी

ठाणे : ठाण्यातील दहीहंडी उत्सवातील जखमी गोविंदांचा आकडा वाढला आहे. मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत १४ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा आकडा वाढून आता २२ वर जाऊन पोचला आहे. यातील पाच गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

जखमींपैकी २१ जणांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात तर एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यातील १७ जणांना किरकोळ जखमा झाल्याने त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर पाच जण अद्यापही उपचार घेत आहेत.

यापैकी बहुतांश गोविंदांना मुका मार तर कांही गोविंदांना अधिक मार लागल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यातील १७ किरकोळ जखमी गोविंदावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले तर उर्वरीत पाच पैकी ४ गोविंदावर कळवा रुग्णालयात तर एका गोविंदावर जिल्हा शासकिय (सिव्हील) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिग्नेश तांबडे (२६) रा.कळवा, भुसार आळी, ऋषिकेश धायबर (२१) रा. गोकुळ नगर, ओम शेंडगे (२२), गणेश औनले (४०), आदित्य कांबळे (१२) रा. मानपाडा अशी उपचार सुरू असलेल्या जखमी गोविंदांची नावे आहेत.