ठाणे : उल्हासनगर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांविरुद्ध पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला कॅबिनमध्ये बोलावून तिच्याशी लगट केल्याचे पीडित फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित आयुक्त हे पीडित महिला कर्मचाऱ्याला केबिनमध्ये बोलावून कमेंट पास करायचे, तू छान दिसतेस, तुझे कपडे खूप छान आहेत, पीडित महिला कर्मचारी या अधिकाऱ्याला बोलायची तुम्ही माझे वरिष्ठ आहात तुम्ही असे माझ्याशी बोलू नका तरीही अधिकारी वारंवार कमेंट पास करत असल्याने अखेर महिलेच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, उल्हासनगर महानगर पालिकेत सन 2011 पासून सदर महिला कनिष्ठ लिपिक या पदावर नोकरीत आहे. सध्या सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर कर्तव्य बजावत आहे. विशेष म्हणजे 20 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडेही ईमेलद्वारे त्यांनी तक्रार केली होती. त्यानुसार, पोलीस ठाण्यात महिलेस बोलावण्यात आले होते, पण वैयक्तिक कारणास्तव त्या हजर राहू शकल्या नाहीत, असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी महिलेचे पती उल्हासनगर महानगरपालिकेत ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. मात्र, 2010 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्याजागी सन 2011 मध्ये त्यांना कनिष्ठ लिपिक या पदावर अनुकंपा तत्त्वार नोकरीवर घेण्यात आले आहे. सन 2017 मध्ये निवडणूक कार्यालयीन विभागात काम करत असतांना पीडित महिलेची आरोपी अतिरिक्त आयुक्तांसोबत ओळख झाली होती. तेव्हापासूनच संबंधित अधिकारी माझ्याशी लगट करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते, असे फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच, 14 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजे गतवर्षी संबंधित महिलेने आयुक्तांविरुद्ध महापालिकेच्या संबधित विभागात तकार दिल्याचेही फिर्यादीत सांगितले आहे.