शहापूर : शहापूर तालुक्यातील शहापूर-बामणे-तुते-सरलांबे रस्त्यावरील तुते गावालगत असणारा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याने एस.टी महामंडळाची बस पुढील गावांमध्ये जात नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक ञास सहन करावा लागत आहे.
या पुलावरुन पुढील अर्जुनली, खरीवली, सरलांबे, तुते आदी गावांचा एसटीचा संपर्क तुटला आहे. या पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत, तर सरक्षंक कठडे तुटले असून कधीही मोठा अपघात होऊ शकतो. किंबहूना एखादी गाडी थेट नदी प्रवाहात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकंदरीत पुल धोकादायक बनला असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना पायपीट करत बस पकडण्यासाठी पुलाच्या अलीकडे यावे लागत आहे.
दरम्यान याबाबतची माहिती प्रहारचे युवा संघटक मयूर किरपण यांच्या निदर्शनास आल्याने प्रहार पदाधिकाऱ्यांनी शहापूर बांधकाम विभागाचे उपअभियंता यांची तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांनी भेट घेऊन पुलाची तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे.