मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी
शहापूर: मुंबई-नाशिक महामार्गावर गेल्या वर्षभरापासून वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारे व नाशिककडून मुंबईकडे जाणारे वाहनचालक अनेक दिवसांपासून हैराण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समस्येची गंभीर दखल घेत ठाणे ते शहापूरपर्यंत पाहणी केली तसेच ही कोंडी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना १५ दिवसांची मुदत दिली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील आसनगाव रेल्वे ब्रिजवरील महामार्गावर होऊ घातलेला उड्डाणपूल आणि आसनगाव येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलांची संथगतीने सुरू असलेली कामे, त्यातच महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे यामुळे वाहनचालक आणि प्रवासी काही वर्षांपासून हैराण झाले आहेत. या बाबीची गंभीर दखल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्यावर प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली तसेच संबंधित महामार्ग प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीमध्ये महामार्गाची परिस्थिती पूर्ववत न झाल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ. डी.एस.स्वामी, शहापूर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे, तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे,संपर्क प्रमुख आकाश सावंत, महिला आघाडी तालुका प्रमुख विद्या फर्डे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निलेश भांडे, बाजार समिती उपसभापती शरद वेखंडे, सचिव भरत बागराव, प्रशांत ठाकरे आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक महामार्गावर उपस्थित होते.