ठाण्यात उभे राहत आहे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे

* अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ पोलिसांचा समावेश
* पीडित नागरिकांचे हेलपाटे वाचणार

आनंद कांबळे/ठाणे

ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांची लवकर उकल व्हावी यासाठी ठाण्यात पहिले अत्याधुनिनिक तंत्रज्ञानाने युक्त स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन निर्माण करण्यात येत आहे. या पोलिस ठाण्याचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते.

ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. मागील सात महिन्यांत ऑनलाईन फसवणुकीचे ४३२ गुन्हे ठाण्यात घडले असून १३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लक्ष्य करत आहेत. अनेक सुशिक्षित नागरिक देखिल त्यांच्या अमिषाला बळी पडत आहेत. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त नफा कमवा, पार्सल आले आहे, लॉटरी लागली, कमी खर्चात सहलीला जा, अशा प्रकारचे आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच महिलांना अश्लील फोटो पाठवून त्यांना ब्लॅकमेल करणे, मोबाईल चोरणे अशा अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे ठाणेकरांच्या सेवेत १५ ऑगस्ट रोजी येणार आहे.

या पोलिस ठाण्यात सॉफ्टवेअर तज्ञ पोलिस नियुक्त केले जाणार असून ठाणे पोलिसांची सायबर लॅब या पोलिसांचे काम हलके करणार आहे. ऑनलाईन गंडा घातल्यानंतर पोलीस ठाण्यात नागरिकांना चकरा माराव्या लागत होत्या. त्या या पोलिस ठाण्यामुळे कमी होणार असून या पोलिस ठाण्यात सायबर गुन्ह्यांची नोंद होऊन त्याचा तपास देखिल याच पोलिस ठाण्यातून होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला दिली.

अनेक सायबर गुन्हेगार हे परदेशातून किंवा परराज्यातून गुन्हे करत असतात. त्याची तक्रार लवकर केली तर गुन्हेगारांना पकडणे आणि बँकेतील पैसे गुन्हेगारांच्या खात्यात जाण्यापासून या पोलीस ठाण्यामुळे टळू शकते, असे देखिल तो अधिकारी म्हणाला.

या पोलिस ठाण्यात ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अशा पोलिसांकडून अर्ज मागविण्यात आले असल्याचे देखिल तो अधिकारी म्हणाला.