स्त्री मतदारांच्या संख्येत सर्वाधिक वाढ
ठाणे: ठाणे जिल्ह्यात एक लाख २४,४०७ मतदारांची वाढ झाली असून यात सर्वाधिक वाटा स्त्री मतदारांचा आहे. स्त्री मतदारांची ६२,६५२ तर पुरुष मतदारांची ६१,७६० वाढ एवढी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्त्री मतदार ३१ लाख ४२,८५९ तर पुरुष मतदारांची संख्या ३६ लाख ५७,०५१ अशी एकूण ६८ लाख १२४४ मतदारांची संख्या झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जुलै २०२४ या पासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (दुसरा) घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची माहिती देताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी वाढलेल्या मतदारांबाबत समाधान व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकी दरम्यान, ठाणे जिल्ह्यात मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत ६६ लाख ७६,८३७ मतदार संख्या झाली. त्यानंतरही मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु असल्याने त्यात एक लाख २४,४०७ मतदानाची भर पडली असून ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या थेट ६८ लाख १२४४ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक ६२,६५२ स्त्री मतदारांची वाढ झाली आहे. स्त्री मतदारांची संख्या ३१ लाख ४२ हजार ८५९ इतकी तर, पुरुष मतदारांची ६१ हजार ७६० वाढ झाल्याने ३६ लाख ५७,०५१ इतकी वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील १८ ते १९ वयोगटातील मतदारांमध्ये १३ हजार ३६१ इतकी वाढ झालेली आहे. ३ मे २०२४ रोजी मतदारांची संख्या एक लाख ५ हजार ९६६ इतकी होती. तर, ६ ऑगस्ट २०२४ रोजी मतदारांची संख्या एक लाख १९ हजार ३२७ इतके होते.
जिल्ह्यातील महिलांच्या प्रमाणातही दोनने वाढ झालेली आहे. ३ मे २०२४ रोजी पुरुषांच्या एक हजार संख्येच्या तुलनेत महिलांचे प्रमाण ८५७ होते, ते ६ ऑगस्ट २०२४ रोजी ८५९ एवढे झाले आहे.