ठाणे : महामार्गांवर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांची ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी झिंग उतरवली असून त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केल्याने वाहचालकांची तारांबळ उडाली आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. परिवहन अधिकाऱ्यांनी महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांची अचानक ब्रिथ ॲनलायझरने तपासणी केली असता ३० वाहनचालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे तपासणी करताना आढळून आले. त्यांच्या विरोधात कारवाई करून न्यायालयात दंड किंवा शिक्षेसाठी शिफारस करण्यात आली आहे.
महामार्गांवर किंवा शहरांत दारू पिऊन गाडी चालवून अनेक शहरात हिट अँड रनचे अनेक गुन्हे सध्या घडत आहेत. दारू पिऊन गाडी चालवल्याने अपघातात देखिल वाढण्याची भीती असल्याने परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये ३० वाहन चालक दोषी आढळले आहेत. ही मोहीम अशीच सुरु ठेवण्यात येणार असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिस विशेष मोहीम राबवून कारवाई करत असतात. त्यांनी देखिल गटारीच्या पूर्व संध्येला मोहीम राबवून ४७जणांच्या विरोधात कारवाई केली होती.