अंबरनाथ: रिमझिम बरसणारा पाऊस त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांनंतर सोमवारीच सुरू झालेला श्रावण महिना यामुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रावण मासारंभाला सुरुवात झाली.
गेल्या काही दिवसांपासून संततधार बरसणारा पाऊस हलक्या स्वरूपात पडत होता. तरीही अंबरनाथ आणि परिसरातील हजारो भाविकांनी पहाटेपासूनच भर पावसात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. प्राचीन शिवमंदिरात दर सोमवारी तसेच श्रावण महिन्यात सोमवारी आणि महिनाभर भाविकांची अलोट गर्दी होते. महाशिवरात्रीला अंबरनाथला दरवर्षी भरणाऱ्या यात्रेला राज्याच्या विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येतात.
गेल्या काही वर्षांपासून अंबरनाथला श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे होणाऱ्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमुळे मंदिराची महती दूरवर पसरल्याने भाविकांचा दर्शनासाठी ओढा प्रचंड प्रमाणात वाढला आहे.
अंबरनाथच्या दिशेने मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी स्वच्छ खळखळ वाहणाऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाह आणि बाजूला काठावर प्राचीन मंदिर असा मनमोहक देखावा पहावयास मिळत आहे. ग्रामस्थ पाटील मंडळींकडून सकाळी लवकर महादेवाची विधिवत पूजा करण्यात आली. नंतर पडणाऱ्या श्राववण सरीमध्ये रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते. शिवाजीनगर पोलिसांच्या वतीने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.