नवी मुंबईत हिट अँड रन; रिक्षा चालकाचा मृत्यू

नवी मुंबई: पुणे आणि वरळी येथील हिट अँड रनचे प्रकरण ताजे असताना नवी मुंबईतील वाशी सेक्टर ९ मध्ये असाच प्रकार घडला आहे. यात एका भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा कार चालकाने रिक्षाचालकाला चिरडून पसार झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे.

नवी मुंबईतील वाशी येथील अंजुमन शाळेसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हाने एका रिक्षाचालकाला चिरडले. रिक्षाला चिरडल्यानंतर इनोव्हा चालकाने कारसह तेथून पळ काढला. त्यानंतर काही तासांतच या चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आणि रिक्षाही उद्ध्वस्त झाली. या रस्त्यावर चार शाळा असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यामुळे या हिट अँड रन अपघातामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की इनोव्हा चालक सुसाट वेगात होता आणि त्याने रिक्षा लांबपर्यंत ओढून नेली होती. अपघातानंतर लगेचच इनोव्हा चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला.