उल्हासनगर: उल्हासनगरच्या म्हारळ गावात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नसली, तरी घराचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
उल्हासनगरच्या म्हारळ गावात निलेश देहेरकर हे वास्तव्याला असून मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या घराची भिंत शनिवारी सायंकाळच्या सुमारास कोसळली. देहेरकर यांचे घर उंचावर असल्यामुळे ही भिंत त्यांच्या घराच्या खाली असलेल्या दुसऱ्या घराच्या अंगणात कोसळली. सुदैवाने या घटनेत दोन्ही घरातील कुणालाही इजा झाली नाही. मात्र यात देहेरकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. तर दुसऱ्या घराच्या अंगणात उभ्या असलेल्या एका रिक्षाचे मात्र नुकसान झाले.
या घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सध्या महसूल विभागाकडून या ठिकाणी पंचनामा करण्यात आला असून लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी यासाठी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सरपंच योगेश देशमुख यांनी दिली आहे.