उल्हासनगर : पाचव्या मजल्यावरून लिफ्टने खाली येत असताना अचानक लिफ्ट कोसळल्याची घटना उल्हासनगरात घडली. यावेळी लिफ्टमध्ये असलेले ज्येष्ठ नागरिक आपल्या अडीच वर्षांच्या नातवाला वाचवताना गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सरदार पिंजारी हे आपल्या अडीच वर्षांच्या नातवासह उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील सत्यजीवन इमारतीत राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी आले होते. भावाची भेट झाल्यानंतर पिंजारी हे इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्टने खाली येत असताना अचानक लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने लिफ्ट पाचव्या मजल्यावरून सरळ खालच्या मजल्यावर जोरदार आदळली. वजनदार लिफ्टचा जमिनीवर आदळण्याचा आवाज एवढा मोठा होता की, त्यात एका विस्फोटाप्रमाणे लिफ्टमधील काही भाग हा सरदार पिंजारी यांच्या अंगावर उडाला. ज्यात पिंजारी यांच्या हाताचे आणि पायाचे हाड मोडले आहे. पिंजारी यांच्यासोबत त्यांचा अडीच वर्षाचा नातू देखील होता, पिंजारी यांनी त्याला आपल्या छातीशी कवटाळून सर्व घाव हे स्वतःवर घेतले.
इमारतीचे मालक आणि पदाधिकारी यांनी आपल्याला झालेल्या अपघाताची भरपाई द्यावी तसेच सोसायटीची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती ठेवण्यात यावी, अशी मागणी पिंजारी यांनी केली आहे.