* २४ तासांत ३४ झाडे कोसळून दोघे जखमी
* सखल भागात पाणी तुंबले
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या २४ तासांत तब्बल १८७.९३ मिमी पाऊस पडला. तर त्यानंतर सायंकाळपर्यंत ६६ मिमी पाऊस पडला. पावसाचा मारा आणि सोसाट्याच्या वारा यामुळे शहरात २४ तासांत ३४ झाडे कोसळली आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान झालेच, शिवाय दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन पावसाचा जोर कायम असून यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भास्कर कॉलनी येथील क्षमा शांती इमारतीजवळ मोठे झाड पडले. यामध्ये राबोडी येथील पंचगंगा सोसायटीमध्ये राहणारे काशिनाथ खांबे (५३) हे जखमी झाले. खांबे हे ठाणे महानगरपालिकेच्या गार्डन हजेरी शेड येथील सफाई कर्मचारी आहेत. त्यांना गोडबोले हॉस्पिटल, ठाणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी ठाण्यातील पाचपाखाडी येथील ओपन हाऊस परिसरात झाड कोसळल्याने शशिकांत कर्णिक (६०) हे जखमी झाले. या ठिकाणी उभ्या चारचाकी वाहनावरही झाडाचा काही भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत जखमी कर्णिक यांना नजीकच्या कौशल्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच पडझड झालेल्या झाडाची छाटणी करून रस्ता वाहतुकीकरिता खुला करण्यात आला.
काल बुधवारी सकाळी ८.३० पासून गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत १८७.९३ मिमी पाऊस पडला. तर आज गुरूवारी सकाळी ८.३० पासून सायंकाळी ५.३० पर्यंत ६५.७७ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत २१०० मिमी पाऊस पडला असून गेल्या वर्षी याच कालावधीत १९८९.६१ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत शहरात विविध ठिकाणी तब्बल ३४ झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी झाडे ही धोकादायक स्थितीमध्ये आली आहेत. पावसाळ्यापूर्वी मोठ्या झाडांच्या फांद्याची छाटणी व्यवस्थित होणे आवश्यक आहे. मात्र याबाबत ठाणे महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग याबाबत गंभीर नसल्याने शहरातील झाडांच्या फांद्याची योग्य प्रकारे छाटणी न झाल्याने तसेच काही ठिकाणी तर छाटणी झालीच नसल्याने झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप पर्यावरण तज्ञांकडून केला जात आहे.