माजिवडा पुलावर क्रेन बंद पडल्याने वाहतूक कोंडी

ठाणे: घोडबंदर येथील माजिवडा उड्डाणपुलावर क्रेन बंद पडल्याने सकाळीच वाहतूक कोंडी निर्माण होऊन चाकरमानी आणि नागरिकांचे प्रचंड हाल झाले. सर्व वाहने आतील बाजूने प्रवास करत असल्याने अंतर्गत भागातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

मंगळवारी सकाळी माजिवडा उड्डाणपुलावर घोडबंदर रोड येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर क्रेन बंद पडली. या नादुरुस्त वाहनामुळे मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना ब्रेक लागला. वाहनांची रांग मानपाडा उड्डाणपुलापर्यंत आल्याने वाहन चालकांनी पुढे जाण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला. त्यामुळे ब्रह्मांड, कोलशेत, ढोकाळी, मनोरमानगर, बाळकूम भागातही कोंडी झाली. या कोंडीचा फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांना आणि शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या वाहनांना बसला.