मनसे विधानसभेला स्वबळावर शड्डू ठोकणार?

* प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षकांची नेमणूक
* राज ठाकरे घेणार आढावा

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले असून मनसे पदाधिकाऱ्यांनीही विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील प्रत्येक मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. प्रत्येक मतदारसंघाला निरीक्षक नेमलेले आहेत. त्यामुळे मनसे स्वबळावर लढणार अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मनसेने विधानसभेसाठी 200-250 जागांची तयारी करायला सुरुवात केलेली आहे, अशी माहिती मनसे नेत्यांनी महिनाभरापूर्वी दिली होती. यासंदर्भात महिन्याभरापूर्वी निरीक्षक नेमून प्रत्येक मतदार संघाची चाचपणी करण्यात आली आहे. चाचपणी केलेल्या नेत्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आजपासून पुढील काही दिवस आढावा घेणार आहेत.

मनसेने 200 ते 250 जागांवर काम करण्याचा निर्णय महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत घेतला आहे. यासाठी मनसे नेत्यांची निरीक्षक म्हणून राज्यभरात अनेक मतदारसंघात नियुक्ती करण्यात आली होती. या मतदारसंघांची मनसे नेत्यांनी चाचपणी करत आखणी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून पुढील दोन दिवस आढावा घेत आहेत. 70 ते 80 जागांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आढावा घेतला आहे तर पुढील काही दिवसांत ते इतर जागांचा आढावा घेणार आहेत. ताकद असलेल्या मतदारसंघांमध्ये पक्ष संघटन वाढवणे तसेच आगामी विधानसभेच्या दृष्टीने काम करणे यावर भर देणार असल्याचे कळते.