ठाण्यात अडीच महिन्यांत ४११ वृक्ष कोसळले

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात गेल्या अडीच महिन्यात तब्बल ४११ वृक्ष उन्मळून पडले आहेत. तर जानेवारी ते १९ जुलैपर्यंत एकुण ४६४ वृक्षांचा नाहक बळी गेला तर ३४२ वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत.

नागरी विकासकामांसाठी होत असलेले कॉक्रिटीकरण, छुप्या पद्धतीने इंजेक्शन, ऍसिड झाडांच्या मुळावर टाकले जात असल्याने सर्रास निसर्गाची हानी होत असल्याने पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षांची महत्वाची भूमिका आहे. ठाणे शहरात सुरू असलेली नागरी विकासकामे झाडांच्या मुळावर येत आहेत. रस्ता खणताना जमिनीत रुतलेली झाडाची मुळे तुटल्यामुळे वाढलेली झाडं अचानक उन्मळून पडू लागण्याच्या घटना वाढीस लागल्या.

गेल्या अडीच महिन्यांत तब्बल ४११ वृक्ष जमीनदोस्त झाले आहेत. जानेवारी महिन्यात सात वृक्ष, फेब्रुवारी १०, मार्च १६, एप्रिल १९, मे १५५, जून १७४ तर १९ जुलैपर्यंत ८२ वृक्ष उन्मळून पडले आहेत. जानेवारीपासून आजपावेतो एकूण ३४२ वृक्षांच्या फांद्या तुटल्या असल्याची माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली.