बसमध्ये चढताना हातातील सोन्याची बांगडी कापून चोरांचे पलायन
ठाणे : वृद्ध नागरिकांना हेरून त्यांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या सराईत चोर असलेल्या दोन भावांना कळव्यातील एका ७३ वर्षांच्या आजीबाईंनी गस्तीवरच्या पोलिसांच्या मदतीने पकडून दिले आहे. बसमध्ये चढताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कापून या चोरांनी पलायन केले होते. या घटनेनंतर समाज माध्यमांवर या महिलेचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खारीगाव येथील वासुदेव पार्क येथे राहणाऱ्या गीता पवार या ७३ वर्षांच्या आजीबाई काल गुरुवार १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घरातून स्वामी समर्थ मठाकडे जाण्यास निघाल्या. रस्ता ओलांडून त्या समोरील थांब्यावर उभ्या राहिल्या. ठाणे परिवहन सेवेची बस येताच त्यांनी मागील दरवाजाने चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या मागे असलेल्या दोन तरुणांनी त्यांना बोलण्यात गुंतवले. त्यापैकी एकाने त्यांच्या उजव्या हातातील अडीच तोळ्यांची सोन्याची बांगडी धारदार शस्त्राने कापली. त्याचवेळी गीता पवार यांनी मागे वळून त्यांना पाहिले आणि आरडा ओरड केली. तोपर्यंत ते दोघे पसार झाले.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून गीता पवार या पुढील थांब्यावर उतरल्या. तेथे गस्तीवरील दोन पोलिस त्यांना दिसले. झालेल्या प्रकाराची माहिती त्यांनी पोलीस हवालदार श्री. डामसे आणि श्री.खेडकर यांना दिली. हे दोन्ही पोलिस बाईकने मागील थांब्याकडे रवाना झाले. मागोमाग गीता पवार यांनी देखील रस्त्यावरून जाणाऱ्या एका बाईकस्वार तरुणाकडे लिफ्ट मागितली आणि मागील थांब्यावर पोहोचल्या.
घटनास्थळी पोलिस आणि आजीबाई पोहोचताच शोध सुरू करण्यात आल्या. त्यावेळी आजीबाईंना ते दोन तरुण दिसून आले. त्यांनी त्या चोरांना ओळखतच तत्काळ सोबत असलेल्या पोलिसांना इशारा केला. तसे पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली. पोलिसांना पाहताच ते चोर पळू लागले. परंतु पोलिसांनी अखेर त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.
पोलिस चौकीत चोरांना नेऊन आजी बाईंकडून पुन्हा ओळख पटवून घेण्यात आली. सुरुवातीला चोरांनी हात वर करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून चोरलेली सोन्याची बांगडी ताब्यात घेण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गायकवाड आणि अविनाश गायकवाड अशी आरोपींची नावे असून ते सराईत चोर असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस हवालदार वाय.एम. शेळके हे करीत आहेत.
अशा कठीण प्रसंगी ७३ वर्षांच्या आजीबाईंनी दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधानाचे कळवा परिसरात आणि समाज माध्यमांवर कौतुक होत आहे.