दक्षिण भारतातून शेकडो मैलांचा प्रवास
ठाणे : गरुडासारखी दिसणारी ‘ब्राम्हणी’ घार दक्षिण भारतातून शेकडो मैलांचा प्रवास करुन ठाण्याच्या खाडीत आली आहे. मासे पकडण्यासाठी पाण्यावर झेपावताना तिची ‘नजाकत’ पाहण्यासारखी असते.
समुद्र-खाडीतील माशांसह नदी तलावांमधील माशांचा फडशा पाडण्यासाठी ही घार दक्षिण भारतातून येते. हिवाळ्यात ठाणे खाडीच्या दिशेने अनेक देशी-विदेशी पक्षी स्थलांतरित होतात. ब्राम्हणी घारही सध्या पक्षी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्वसाधारण घारीसारखी ही घार दिसत असली तरी ती आकाराने लहान आहे.
पावसाळा सुरू झाला की, ब्राम्हणी घार केरळ-गोवा राज्यातून कोकणाच्या दिशेने येते. शरीराचा रंग तांबूस तर डोके आणि मानेचा रंग पांढरा आहे. काळ्या घारींची शेपटी दुभंगलेली असून, ब्राम्हणी घारीची शेपटी गोलाकार आहे. खारफूटीच्या जंगलात झाडाच्या शेंड्यांवर ‘ती’ बसलेली दिसून येते, अशी माहिती पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी दिली.
‘ब्राम्हणी घार खाडीवर आहार आणि विहार करताना पटकन समजून येत नाही. गरुडासारखीच तीक्ष्ण नजर असणारी ही घार सावजाला पापणी लवते ना लवते तोच टिपते. मासे हे त्यांचे सर्वात आवडते खाद्य आहे. समुद्र अथवा नदीकाठीही या घारींचा वावर असतो. डिसेंबर ते जानेवारी हा या घारींचा विणीचा हंगाम असून पावसाळ्यात दिसणा-या या घारी सप्टेंबरनंतर दक्षिण भारतात माघारी जात असल्याचे पक्षी अभ्यासक मंदार बापट म्हणाले.
कारखान्यातून सोडले जाणारे रासायनिक द्रव्य, शहरातील सांडपाणी आदी घटकांमुळे ठाणे खाडीतील पाणी प्रदूषित झाले आहे. खाडीत ऑक्सिजनची मात्राच नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे खाडीत मासे, खेकडे, कोळंबीसारखे ‘जलचर’ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु ठाणे महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते खाडीत सोडल्यामुळे पाणथळ जागेत जलचरांची साखळी वाढली आहे. याच ठिकाणी या ‘ब्राम्हणी घारी’ माशांचा फडशा मारण्यासाठी घिरट्या मारत आहेत, असे मंदार बापट यांनी सांगितले.