ठाणे-मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे अर्धी भरली

ठाणे : यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जिल्ह्यातील शहरी ग्रामीण व धरणांच्या क्षेत्रात दमदार हजेरी लावली. ठाणे आणि मुंबईला पाणी पुरवठा करणारी प्रमुख धरणे अर्धी भरल्याने ग्रामीण आणि शहरी भागाला दिलासा मिळाला आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात असलेल्या प्रमुख धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणांतील पाणी पातळीत समाधानकारक वाढ होत आहे. भातसा धरण क्षेत्रात आतापर्यंत १२७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भातसा धरणात सध्या ५२.११ टक्के पाणीसाठा झाला आहे. धामणी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धामणी धरणात सध्या ४८.२५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मध्य वैतरणा क्षेत्रात आजतागायत १०९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या मध्य वैतरणा धरणात ३५.१९ टक्के पाणीसाठा झाला आहे. बारवी धरण क्षेत्रात आजतागायत ९९१ मिमी पाऊस पडला असून ४४.३१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोडकसागर तलाव क्षेत्रात आतापर्यंत १०९९ मिमी पाऊस पडला असून तलावात ५७.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर तानसा क्षेत्रात आजपर्यंत ११९२ मिमी पाऊस झाला असून धरणात ७३.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे.

मागील काही दिवसांपासून ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या सातत्याने पडणाऱ्या पावसाने नद्यांच्या पातळ्यांनी धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे नदी पात्राजवळील अनेक गावांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरले असल्याचे दिसून आले. त्यात धरण क्षेत्रात ही पाऊस चांगला झाल्याने धरण पातळीतील आजच्या टक्केवारी चांगलीच वाढ झाली असल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे.

धरणाच्या पाणीसाठ्याची टक्केवारी

* भातसा ५२.११टक्के (४९० दलघमी)
* धामणी ४८.२५ टक्के (१३३.३३ दलघमी)
* कवडास ४४.७८ टक्के (४.४६ दलघमी)
* अप्पर वैतरणा ३६.७५ टक्के (१२१.७६ दलघमी)
* वांद्री ८१.९५ टक्के (२९.४५ दलघमी)
* मोडकसागर ५७.६१ टक्के (७४.२७ दलघमी)
* तानसा ७३.४९टक्के (१०६.६२ दलघमी)
* म.वैतरणा ३५.१९टक्के (६८.११ दलघमी)
* बारवी ४४.३१टक्के (१५०.१३ दलघमी)