पावसाळ्यात जंगल भ्रमंतीसाठी ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

पावसाळा म्हटलं की, अनेकांना वेध लागतात ट्रेकिंगचे. जितक्या आतुरतेने मोर पावसाची वाट पाहत असतो तितक्याच आतुरतेने प्रत्येक गिर्यारोहक पावसाची वाट पाहत असतात. त्यामुळे, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते या ऋतूत आपल्या आवडत्या ठिकाणी भेट देण्यासाठी बाहेर पडतात. पावसाळ्यात हिरवेगार झालेले डोंगर बघायला, निसर्ग अनुभवायला त्या ठिकाणी जाण्याची अनेकांची इच्छा असते. पावसाळ्यातील जंगल ट्रेकला तुम्ही जाऊ शकता. महाराष्ट्रातील जंगल भ्रमंती विषयी थोडक्यात माहिती घेऊया…….

रोजच्या धकाधकीच्या आणि घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईतून थोडं दूरवर गेलं की अनेक ठिकाणी आजही आपल्याला जंगल भ्रमंतीचा आनंद घेता येतो. ट्रेनने कर्जतला उतरून टमटम रिक्षा किंवा इको गाडीने कोंढाणा गावापर्यंत जाताना उल्हास नदी कायम आपल्या सोबतीला असते. गावात पोहोचल्यावर तिकडच्या काही घरांमध्ये आपली तात्पुरती व्यवस्था होऊ शकते आणि आपण मोकळ्या हाताने किंवा मोजक्या सामानाबरोबर कोंढाण्याची लेणी बघायला जाऊ शकतो. गावापासून अंदाजे एक- सव्वा तासाच्या अंतरावर डोंगरात ही लेणी असून पायवाट चांगलीच मळलेली आहे. वाटेत विविध प्रकारच्या वनस्पती, पक्षी, कीटक, जंगली फुले, धबधबे, ओहोळ अशी सर्व निसर्ग संपदा अनुभवायला मिळते. लेण्यांना भेट देऊन खाली आल्यावर त्याच घरांमध्ये गरमागरम जेवणाची सुद्धा व्यवस्था होऊ शकते. गावात विचारल्यास वाटाड्या सुद्धा मिळू शकतो, कुठल्याही नवीन ठिकाणी जाताना वाटाड्या किंवा माहितगार बरोबर असणे केव्हाही चांगले.

तसेच भिवपुरी स्टेशनवर उतरून भिवपुरी ते माथेरानचा ‘गारबट पॉईंट’ हा ट्रेक सुद्धा तरुणाईमध्ये प्रसिद्ध झालेला बघायला मिळतो. सुरुवातीला पाण्याच्या बाजूने जाणारा ट्रेक नंतर चढण चालू होऊन गावात पोहोचतो आणि त्या गावातूनच उभा चढ आपल्याला नव्याने उगवलेल्या हिरव्यागार गवताच्या पठारावर घेऊन जातो. एका बाजूला मोरबे धरण तर दुसऱ्या बाजूला भिवपुरी, नेरळ इत्यादी ठिकाणी पसरलेली वस्ती, शेती असे विहंगम दृश्य या ठिकाणाहून बघायला मिळते. पठाराच्या दुसऱ्या बाजूस गारबट पॉईंटला जाण्यासाठी टेकडी चढून वर जावे लागते. या ठिकाणी आपल्याबरोबर माहितगार आणि अनुभवी व्यक्ती असणे आवश्यक आहे. गारबट पॉईंटला पोहोचल्यावर मागे वळून बघितल्यास आपण पायपीट करत आलेली पायवाट तसेच एखाद्या कॅलिडोस्कोपमध्ये दर सेकंदाला बदलणाऱ्या आकाराप्रमाणे बदलणारी ढगांची रचना, क्षणात सर्वत्र ढगांची सोबत तर क्षणात दूर दूर पर्यंत दिसणारा, हिरवाईने नटलेला, हिरव्या रंगाच्या असंख्य छटा असलेल्या डोंगररांगा बघत वेळ कसा जातो हे कळतही नाही.

पावसाळी जंगल भ्रमंतीसाठी कर्जत जवळील अजून एक ठिकाण प्रसिद्ध आहे ते म्हणजे पेठचा किल्ला. कर्जत स्टेशनवरून या किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था होऊ शकते. वाटेत कवाड गावच्या प्रसिद्ध गणपतीला नमस्कार करून आपण पेठच्या दिशेने प्रस्थान करतो. गावात पोहोचल्यानंतर आपले अतिरिक्त सामान एका ठिकाणी ठेवून, चहा-नाश्ता करून किल्ल्याची भलीमोठी वाट म्हणजे रस्ता आपल्याला पेठ वाडीमध्ये घेऊन जातो. पावसाळ्यातील भटकंतीचे अजून एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे नेरळ जवळील पेबचा किल्ला याला विकटगड असे देखील म्हणतात. नेहमी या ठिकाणी जाणारे आणि इतरांनाही घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर या किल्ल्याच्या भ्रमंतीला जावे. कारण अरुंदवाट, दोन ठिकाणी थोडेसे प्रस्तरारोहण शिडीवरून उतरल्यावर दोन्ही बाजूला दरी असलेली आणि शेवाळे जमा झालेली वाट या सर्वांतून सुरक्षितपणे निभावण्यासाठी अनुभवी व्यक्तीची गरज आहे.

त्यानंतर पालघरच्या जवळ असलेला अशेरीगड, पाली गणपती मंदिराच्या शेजारील सरसगड, सहारा सिटी ॲम्बी व्हॅलीच्या बाजूला असलेला कोरीगड, जांभूळ पाडा गावाजवळील असलेला मृगगड, नाडसूर गावाजवळील ठाणाळे लेणी, इत्यादी ठिकाणे तुलनात्मक कमी गर्दीची आणि तितकीच सुंदर आहेत.

पावसाळ्यात तुम्ही शनिवारी व रविवारी फिरायला गेल्यावर तुम्हाला खूप गर्दी मिळण्याची शक्यता असते. अनेक उत्साही एक किंवा दोन वेळेला या ठिकाणी जाऊन आल्यानंतर आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा ओळखीतल्या व्यक्तींना स्वतःला कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना या ठिकाणी घेऊन येतात. त्यामुळे संभाव्य धोक्याची कल्पना नसताना काही ठिकाणी पर्यटक अडचणीत सापडतात. आणि त्यांच्याबरोबर आलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व भोगावे लागते. त्यामुळे आपण कोणाबरोबर चाललो आहोत, त्यांचा अनुभव, त्यांनी आखलेला कार्यक्रम, बरोबर असलेले साहित्य आणि व्यक्ती यांची खातरजमा प्रत्येकाने करणे आणि स्वतःवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

जंगल भ्रमंतीला जाण्याचा विचार करताना प्रत्येकाने न विसरता खालील गोष्टींचे पालन करावे –

आपण कुठल्या ठिकाणी जाणार आहोत, आपल्याबरोबर कोण आहे याची माहिती आपल्या कुटुंबात किंवा जवळच्या व्यक्तीला देणे आवश्यक आहे. आपल्या बरोबर स्वतःचे ओळखपत्र किंवा ओळखपत्राची प्रत सहज मिळेल अशा ठिकाणी स्वतःजवळ आणि आपल्या बॅगेत ठेवावी. त्याचबरोबर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, टोपी, मोठा रुमाल, मिडीयम नॅपकिन, शक्यतो नायलॉनचे पूर्णपणे अंग झाकेल असे कपडे, बॅगेमधील सर्व वस्तू प्लास्टिकच्या पिशवी मध्ये ठेवाव्या, मोबाईलसाठी वेगळी प्लास्टिकची पिशवी किंवा कव्हर असणे आवश्यक आहे. आवश्यक पैसे, पाण्याची बाटली, बदलण्यासाठी कपडे, रेन जॅकेट किंवा पोन्चो, डस्टिंग पावडर, एक जोडी शुलेस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगल्या प्रतीचे बूट आणि चांगली मजबूत बॅक पॅक हे आवश्यक आहे.

गीत नाईक
संचालक – ‘SWAN52’ Tours.
संपर्क ७५०६३८१००१

SWAN 52 Tours तर्फे आगामी काळात विविध संकल्पनांवर आधारित नाणेघाट, मोराची चिंचोली, गिरनार, राफ्टींग आणि लडाख या सहलींचे आयोजन केले आहे.