वावीकर आय इन्स्टिट्युट आणि ठाणेवैभव यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ठाणे: आजच्या मुलांना शंभर-शंभर गुण मिळाल्याचे ऐकून थक्क व्हायला होते. असे आकडे केवळ मला ताप असताना कानावर पडतात, श्रेयस तळपदे यांनी गमतीत म्हणत दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
वावीकर आय इन्स्टिट्युट आणि ठाणेवैभव यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी वावीकर आय इन्स्टिट्युटच्या सभागृहात करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर आणि डॉ. वैशाली वावीकर तसेच ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि सरस्वती विद्यालय शाळेच्या अध्यक्षा मीरा कोरडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आजच्या विद्यार्थ्यांच्या हुशारीने डोळे दिपले जातात. पण प्रत्येक हुशार विद्यार्थ्याने त्याची हुशारी आपल्या मित्रांप्रति सुद्धा उपयोगात आणावी आणि एकंदर आपला समाज हुशार करावा, असे आवाहन श्रेयस तळपदे यांनी केले.
ठाण्यातील 42 गुणवंत विद्यार्थ्यांनी आपला सत्कार पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत स्वीकारला. या वेळेस अनेक विद्यार्थ्यांनी आपली यशोगाथा थोडक्यात मांडली.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही सतत विविध उपक्रम राबवत असतो. मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे, किंवा ठाणे 2030 मध्ये कसे असावे याचा विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे अशा निरनिराळ्या योजना आम्ही राबवत असतो. मुलांना एक वेगळी ‘दृष्टी’ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे देखील डॉ. चंद्रशेखर वावीकर म्हणाले.
संघर्षातून संपादन केलेले यश श्रेयश असते आणि आत्मिक आनंद देत असते. अशा श्रेयश कामगिरीला दाद देण्यासाठी अभिनेते श्रेयश तळपदे यावेत, हा आनंददायी योगायोग आहे, असे ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ म्हणाले.
जे श्रेयश असते ते कायम रहाते आणि जे प्रेयस असते, ते क्षणभुंगर ठरू शकते, असे सांगून श्री. बल्लाळ यांनी मुलांना यशामुळे हुरळून जाण्याऐवजी त्यातून प्रेरणा घेऊन अधिक कष्ट करण्याचा सल्ला दिला. हे यश डोक्यात जाऊ देऊ नका, ते टिकविण्याचा प्रयत्न करा. यशाला संवेदनशील मनाची साथ मिळाली तर देशहिताचे व्यापक काम प्रभावीपणे करता येईल असे ते म्हणाले, ‘आयक्यू’प्रमाणे ‘ईक्यू’ (इमोशनल कोशन्ट) वर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
अभ्यासाबरोबर मुलांनी आपले छंद जोपसावेत. मला विशेष आनंद आहे की 100 पैकी 100 गुण मिळवणारे विद्यार्थी आपले छंद जोपासत होते. त्याचा परीक्षेच्या गुणात उपयोग झालाच मात्र त्याने अधिक आपली एकाग्रता देखील वाढते, मानसिक संतुलन अधिक चांगले राहते, असे मत डॉ. वैशाली वावीकर यांनी व्यक्त केले.
आता इतक्या नवीन करियरमध्ये संधी उपलब्ध झाल्या आहेत, मुलांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांवर कोणतेही प्रेशर आणू नये. त्यांना हवे ते क्षेत्र निवडायचे स्वातंत्र्य द्यावे, तरच ते यशस्वी होऊ शकतील, असे मीरा कोरडे यांनी सांगितले.
व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शाळांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना जोशी यांनी केले.