बंडू धडपडेला कोणत्याही परिस्थितीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षातर्फे उमेदवारी हवी आहे. त्यासाठी तो अक्षरश: अहोरात्र परिश्रम करीत आहे. सकाळी उठल्यापासून बंडू आमच्या सोसायटीच्या नाक्यावर कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांसाठी रिक्षा मिळवून देण्याचे अशक्यप्राय काम करीत असतो. तास-दीड तासांत ही मोहीम संपली की तो परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भाज्या-औषधे आणून देण्याच्या कामाला लागतो. दुपारच्या वेळेत सरकारी खात्यांना भेटी देऊन नागरिकांची गाऱ्हाणी मांडत असतो. अधिकारी-कर्मचारी यांच्याशी सौहार्दाचे संबंध रहावेत म्हणून या मोसमात त्याने आंब्याच्या किमान शंभर पेट्या भेट म्हणून दिल्याचे बोलले जात आहे. कालच तो घाऊक छत्र्या, रेनकोट वगैरे खरेदी करताना अनेकांना दिसला. दिवसभर अशा धावपळीत असलेला बंडू रात्री-अपरात्री परिसरातील गरजू नागरिकांना बारमधून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे कामही करीत असतो. अशी अहोरात्र मेहनत केल्यावर नशिबाची पहाट उजाडणार यावर त्याचा ठाम विश्वास आहे.
पक्षश्रेष्ठींच्या मनात भरण्याचे सर्व प्रयत्न अत्यंत कसोशीने (की असोशीने?) बंडू करीत असताना त्याच्याच पक्षाच्या एका नेत्याने बंडूला फोन करून नाराजी व्यक्त केली.
नेता: हे बघ बंडू, २१ जूनला योगदिन होता. तेव्हा तू कुठे होतास?
बंडू: वट सावित्रीची पूजा करणाऱ्या समस्त महिलावर्गाच्या सेवेत होतो. दोऱ्याची ५० रिळं आणली होती.
नेता: ते ठीक आहे रे. त्यांच्यासाठी तू एरवी भाजीपाला आणून देत असतोसच की! ती मतपेढी सुरक्षित आहे.
बंडू: पण माझं चुकलं तरी काय?
नेता: अरे निवडणूक लढवायची तर उमेदवाराला चार योगासने येण्याची अट घालण्यात आलयाचे तू विसरलात कसं?
बंडू: येतात की मला चार आसने. करुन दाखवीन पाहिजे तर मुलाखतीच्या वेळी.
नेता: ते करशील रे, परंतु तू नियमित योगासने करतोस की नाटक करतोस हे श्रेष्ठींनी कसे ठरवायचं?
बंडू: मी नाही समजलो. मी पक्षाचा जुना कार्यकर्ता. मी खोटं का बरं बोलेन?
नेता: तसं नाही रे. पण तू योगासनं करतोस याचा पुरावा जोडावा लागेल.
बंडू: उद्याच फोटो काढून घेतो.
नेता: तुला कळत नाही. तू योगदिनाच्या दिवशी आसनं करीत होतास याचा फोटो तू काढून घ्यायला हवा होता.
बंडू: अरे बापरे. आता काय करायचं?
नेता: तुला दुसऱ्या पक्षातून प्रयत्न करावा लागेल.
बंडू: ते कसं शक्य आहे? त्याचीही योगासने करण्याची अट असेलच की?
नेता: नाही, सुदैवाने या पक्षाला योगाची इतकी आसक्ती नाही. पण तिकीटासाठी तुला उबाठा, सॉरी पक्षाचा उंबरठा ओलांडावा लागेल.
बंडू: मी रामाचा भक्त आहे. लक्ष्मण रेषा कदापि ओलांडणार नाही.
नेता: आमदार व्हायचे तर तुला एवढे करावेच लागेल. अर्थात तुला धनुर्विद्येत प्राविण्य मिळवावे लागेल.
बंडू: आता ही काय नवी भानगड. लहानपणी लग्नाच्या मंगल कार्यालयाबाहेर वडलांनी घेतलेल्या धनुष्यबाणाने मी खेळलो होतो. त्यानंतर मी धनुष्य-बाण आजपर्यंत हाती घेतलेला नाही.
नेता: अरे तुझी केस भलतीच वाईट आहे. तुला तुतारी तरी वाजवता येते का?
बंडू: नाही येत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेली दोन वर्षे मी गणेशचतुर्थी आणि लक्ष्मीपुजनासाठी घरोघरी जाऊन ‘कमळ’ वाटत आलो आहे.
नेता: मान्य, पण तू योगदिनाच्या दिवशी गैरहजर राहिल्यामुळे तुला उमेदवारी मिळणे कठीण आहे.
बंडू: पण मी म्हणतो राजकारणात योगाला इतके महत्त्व देण्याचे कारण काय?
नेता: हे बघ सध्याचे युग हे आघाडी-युतीचे युग आहे.
बंडू: बरोबर. पण त्याचा योगासनांशी काय संबंध?
नेता: कसा नाही? अरे, शरीर लवचिक असेल तर मन लवचिक बनते.
बंडू:मनावर संस्कार होण्यासाठी ‘मन की बात’चे सर्व कार्यक्रम मी नियमितपणे ऐकले आहेत.
नेता: बंडू शेठ, तुम्ही तुमच्या मनाचा विचार करताय. मी तुमच्या राजकीय नवाबद्दल बोलतोय. तुमचे हे मन लवचिक असेल तर तुमच्या पक्षाला लवचिकपणा येतो. मग कितीही कडक तत्वे असली तरी मऊ पडतात. कणा कितीही ताठ असेल तर वाकू शकतो. कंबरेत वाकणे, एखाद-दोन कोलांट उडया मारण्याची क्षमता असणे, शिर्षासन करुन जगाकडे उलटे पहाणे, विधानसभेत शवासनाचे प्रात्यक्षिक करुन दाखवणे अशा विविध योगप्रकारांत प्राविण्य असावे लागते.
बंडू: तितकाही मी पारंगत नाही. म्हणजे मला तिकिटासाठी दुसरीकडे प्रयत्न करावे लागतील तर?
नेता: हो. नाईलाज. सत्ता हाच तू मोक्ष मानत असशील तर सत्तेचे (प्र)योग या विषयांत तुला करावे लागतील.
बंडू: आता तुम्हीच मला पर्यायी पक्ष सुचवा.
नेता: आपला अजून एक मित्र पक्ष आहे. त्याचे ब्रिदवाक्य आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही.’ या पक्षात ना योगाची अट की लवकर उठण्याची. तिथे तू प्रयत्न कर.
बंडू: हे झकास झाले. मला कोणी बिनशर्त उमेदवारी देणार असेल तर मी आजच त्यांना भेटायला जातो. माझ्या पत्रिकेत आमदारकीचा ‘योग’ आहेच मुळी!
नेता : माझे ऐकलंस तर ‘राज’ योगही शक्य आहे, बरं का?!