चैत्र, वैशाख या दोन महिन्यातला उन्हाचा ताप असह्य होऊ लागला की आठवण होते ती काळ्या ढगांमधून बरसणाऱ्या जलधारांची. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा अशा वातावरणनिर्मिती नंतर जेव्हा पाऊस बरसू लागतो तेव्हा पाण्याला जीवन का म्हणतात ते कळतं. अवघ्या सृष्टीला टवटवीत ठेवणारा आणि हिरव्या रंगात न्हाऊन काढणारा पावसाळा म्हणजे पर्यटनासाठी एकदम झकास ऋतू आहे. या पावसाळ्यात तुम्ही घाटमाथ्यांवर जा किंवा सागर किनाऱ्यांवर कुठेही गेलात तरी पावसाची जादू तुम्हाला भारुन टाकल्याशिवाय राहत नाही. पावसाळी पर्यटनात अर्थातच धबधब्यांना विशेष महत्व आहे. आपल्या राकट, कणखर डोंगरांच्या देशात धबधब्यांची कमी नाही. चला तर त्याबद्दल माहिती घेऊया..
लोकलच्या तालावर धावणाऱ्या मुंबईकरांना याच लोकलने गाठता येतील असे धबधबे मुंबईच्या अवती भवती आहेत. अगदी खोपोलीपासून पालघर पर्यंतच्या रेल्वे मार्गावरचे हे धबधबे म्हणजे पावसाळ्यातल्या एक दिवसाच्या पिकनिकसाठी एकदम भारी ठिकाणं आहेत. सकाळी लवकरची कर्जत लोकल पकडून निघालात तर गाडीत चढल्यावरच टॉस करायला हरकत नाही की भिवपुरीला उतरायचं, नेरळला की कर्जतपर्यंत जायचं, कारण या सगळ्या ठिकाणी खळाळते धबधबे तुमचं स्वागत करायला तयार असतातच.
भिवपुरी हे स्थान पूर्वी टाटाच्या विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी प्रसिध्द होते, आता मात्र जुलै ते सप्टेंबर या काळात इथल्या धबधब्यात भिजण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होते. भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनवरुन अर्ध्या तासात भिवपुरी धबधब्याला पोहोचता येते. गावातून जाणारा रस्ता थेट धबधब्याकडेच येतो. भोवतालचा हिरवागार परिसर आणि समोरच्या डोंगरावरून कोसळणारी पाण्याची धार, जिच्याखाली सहज भिजता येते. यामुळे कुटुंबासह येणारे पर्यटक या धबधब्याला जास्त पसंती देताना दिसतात. तुम्ही भिवपुरी आधी आलेल्या नेरळ स्टेशनवर उतरलात तर बाहेर उभ्या असलेल्या रिक्षातून टपालवाडी गाठायची आणि जरा दूर दिसणाऱ्या डोंगराच्या दिशेनं वाटचाल सुरू करायची. या डोंगरावरुनच टपालवाडीचा धबधबा कोसळतो. तीनशे-साडे तीनशे फूटांवरुन कोसळणाऱ्या या धबधब्याचा डोह फारसा खोल नसल्याने इथे धारेखाली भिजणे तसे सुरक्षित आहे. या धबधब्याजवळच दुसरा धबधबा आहे, त्याला आनंदवाडीचा धबधबा म्हणतात. नेरळवरुन माथेरानला जाऊन तिथल्या निसर्गाचा आनंद लुटणारे सगळ्या ऋतुत पाहायला मिळतात, पण नेरळ-माथेरान रेल्वे मार्गावर पावसाळ्यात गर्दी वाढते ती जुम्मापट्टी स्टेशन जवळच्या धबधब्याची मजा लुटण्यासाठी. वळणावळणाच्या छोट्या घाटातून जुम्मापट्टीला जात असतानाच भोवतालचे हिरवेगार डोंगर आणि त्यावरील धबधब्यांच्या पांढऱ्या शुभ्र रेघा तुमचा उत्साह वाढवत असतात. या उत्साहाशी स्पर्धा करणाऱ्या जुम्मापट्टीच्या धबधब्यात भिजताना मुंबईच्या जवळ असे झक्कास ठिकाण आहे याबद्दल मुंबईकर स्वतःला भाग्यवान समजतात.
मुंबईजवळ जव्हार नावाचे हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात जव्हारचा परिसर हिरवाईची वस्त्रे लेवून नटलेला असतो. या जव्हार जवळच दाभोसाचा धबधबा आहे. एखाद्या जिमनॅस्टने नजाकतदारपणे हवेत कमान टाकावी किंवा एखाद्या जलतरणपटूने पाण्यात झोकदार उडी मारावी तशी इथे पाण्याची धार खालच्या डोहात पडते. लेंडी नदीच्या प्रवाहात हा सुमारे चारशे फूटांवरुन कोसळणारा धबधबा तयार झालेला आहे. पावसाळी धुकट हवेत तरंगत असताना हातात चहाचा वाफाळता कप घेऊन हिरव्यागर्द रानातून ओसंडणारी ही जलधारा बघण्यात वेळ कसा जातो कळतही नाही. पण हे असं लोकलच्या आधाराने फारसे धबधबे गाठता येत नाहीत, त्यासाठी महामार्गाची वाटच धरावी लागते. मुंबईहून पुण्याला नेणारा जुना महामार्ग आता जणू विस्मरणातच गेला आहे, पण याच महामार्गावर खोपोलीजवळ एक झक्कास धबधबा आहे, ‘पडसरे धबधबा’. खोपोलीकडून गणपतीच्या पालीकडे जाणारा रस्ता घ्यायचा, या रस्त्यावर पालीच्या साधारणतः सात-आठ किलोमीटर आधी पडसरेकडे जाणारा फाटा येतो. या फाट्यावरुन पुढचा प्रवास करताना भोवतालच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत घेत आपण धबधब्यापाशी कधी पोहोचतो कळतही नाही. पडसरे गावाआधी असलेला हा धबधबा उंचीला फार मोठा नाही पण विस्तार चांगला आहे, त्यामुळे त्याखाली ऐसपैस डुंबण्याचा आनंद घेता येतो.
पावसाळ्यात जायलाच पाहिजे असं एक ठिकाण म्हणजे महाड जवळचे ‘शिवथरघळ’. काही धबधबे भिजण्यासाठी असतात, ज्यांच्याखाली मनमुराद भिजता येते पण काही दुरूनच पाहायचे असतात, त्यातलाच एक म्हणजे शिवथर घळीचा धबधबा. एका बाजूला काळ नदीचा खळाळता, आवेगाने वाहणारा प्रवाह, दुसरीकडे गर्द हिरवाईने भरलेले डोंगर आणि त्यावरुन ओसंडून वाहणारे पाण्याचे प्रपात त्यामुळे आपण खरोखरच एखाद्या अस्पर्श ठिकाणी पोहोचणार याची खात्री पटते. नदीवरचा पूल ओलांडल्यावर गाडीचा रस्ता संपतो आणि कानावर पडू लागतो जलधारेचा अनाहत नाद. डोंगराच्या माथ्यावरुन प्रचंड आवेगाने कोसळणाऱ्या त्या जलप्रपाताला पाहिल्यावर आपोआप समर्थ रामदास स्वामींचे शब्द आठवतात,
‘गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनि चालली बळे । धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे॥’
जणू काही समर्थांनी आधी हे काव्य रचले आणि मग त्याबरहुकूम हा शिवथरघळीचा धबधबा वाहू लागलाय असंच वाटतं. ही घळ म्हणजेच समर्थ रामदास स्वामींचा सुंदरमठ. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारण साधण्यासाठी समर्थ इथे राहिले, याच ठिकाणी त्यांनी ‘दासबोध’ ग्रंथ सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतला. त्यामुळे शिवथर घळ आणि तिथला धबधबा म्हणजे नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक परंपरा आणि आध्यात्मिक अधिष्ठान याचा त्रिवेणी संगमच आहे.
धुक्यात हरवलेले डोंगरमाथे, भोवतालच्या शांततेचं प्रतिबिंब पाण्यात जपणारा विस्तीर्ण जलाशय आणि मधूनच बरसणाऱ्या जलधारा हे निसर्गदृश्य अनुभवायचे असेल तर अहमदनगर जिल्ह्यातील भंडरादरा धरण आणि परिसराला भेट द्यायलाच हवी. या धरणाच्या जलाशयाचे अधिकृत नाव ‘आर्थर लेक’ असले तरी धरण आणि तलाव भंडारदरा नावानेच ओळखले जातात. ऐन पावसाळ्यात हा सगळा परिसर इतका अप्रतिम रुप धारण करतो की ते रुप बघताना मनातले ताण तणाव कधी निवळतात कळत नाही. या परिसरात शेंडी गावापासून साधारण दहा किलोमीटरवर ‘रंधा धबधबा’ हा नैसर्गिक धबधबा आहे. पण यापेक्षाही भंडारदऱ्याला लोक येतात ते ‘अम्ब्रेला फॉल’चे सौंदर्य पाहायला. धरणाच्या सांडव्यातून बाहेर सोडलं जाणारं पाणी इथे एका मोठ्या खडकावरून ओसंडतं, त्यामुळे आपोआप पाण्याची विशाल छत्री उघडल्याचा भास होतो.
खास पावसाळ्यातच आवर्जून जायला हवं अशी आणखी काही ठिकाणं म्हणजे आंबोली घाट, माळशेज घाट, माथेरान, भीमाशंकर, महाबळेश्वर-तापोळा आदी. वेळीअवेळी दाटून येणारे धुके, धुक्याचा पडदा विरळ करायला येणाऱ्या पावसाच्या सरी, पावसाच्या आगमनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी उमललेली रानफुलांची रांगोळी, ढगातला गारवा थेट मनात झिरपणारं वातावरण हे सारं या ठिकाणी अनुभवायला मिळतं. मग आता उशीर नको, या पावसाळ्यात कुठे कुठे जायचं भिजायला ते ठरवा आणि लगेच निघा. मात्र पावसाळी पर्यटन काळजीपूर्वक करावे. फोटो, सेल्फी काढण्याच्या नादात नको ते धाडस करू नये. जिथे जाणार आहात त्या पर्यटनस्थळावर आपल्यामुळे कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. धबधबे, नदी, ओहोळ याचा आनंद लुटताना सावध राहा, विनाकारण धाडस करू नका. आपल्याला जसा सहलीमुळे आनंद मिळणार आहे तसाच तो आपण ज्या परिसरात जाणार तिथल्या लोकांना, निसर्गालाही मिळावा ही काळजी अवश्य घ्यावी.
– मकरंद जोशी,
लेखक, संचालक विहंग ट्रॅव्हल्स
विहंग ट्रॅव्हल्सच्या पावसाळी सहली
शिवथर घळ – 27 आणि 28 जुलै
आंबोली वर्षा सहल – 24 ते 26 ऑगस्ट
लेण्याद्री – शिवनेरी – 17 व 18 ऑगस्ट