नवी मुंबई : डोंबिवली एमआयडीसीत घडलेल्या भीषण आगीची पुनरावृत्ती नवी मुंबई शहरात होऊ नये म्हणून येथील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांची एमआयडीसी अग्निशमन दलामार्फत तत्काळ अग्निसुरक्षा विषयक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत १० जूनपर्यंत एकूण २४० कारखान्यांची तपासणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
डोंबिवलीमधील अमुदान या रासायनिक कंपनीत २३ मे २०२४ रोजी झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत १३ जण दगावले होते. त्यामुळे भविष्यात डोंबिवलीप्रमाणे नवी मुंबईतील एमआयडीसीत अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एमआयडीसी अग्निशमन विभागाकडून रासायनिक कारखान्यांची अग्नी सुरक्षाविषयक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या तपासणी मोहीमेअंतर्गत आतापर्यंत २४० रासायनिक कारखान्यांची तपासणी पूर्ण करून त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या कारखान्यांच्या बाबतीत पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती एमआयडीसी अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख मिलिंद ओगले यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत नवी मुंबईतील किती रासायनिक कारखाने त्यांच्या अग्नीपरीक्षेत उत्तीर्ण होतात याकडे नवी मुंबईकरांच्या नजरा लागल्या आहेत.