शहर विकास विभागाचा कारभार झाला वेगवान!

इमारतींचे नकाशे मंजुरी ऑनलाईन; मानवी हस्तक्षेप येणार शून्यावर

आनंद कांबळे/ठाणे

ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाचा कारभार संपूर्णपणे ऑनलाईन करण्यात आला आहे. वास्तू विशारदांमार्फत नकाशे आणि अन्य कागदपत्रे ऑनलाईन स्वीकारण्यात येत असून इमारती बांधकाम मंजुरीची प्रक्रिया आता वेगवान झाली आहे. तसेच यातील मानवी हस्तक्षेपही कमी झाला आहे.

ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात वास्तु विशारदांच्या मार्फत त्यांचे नकाशे सादर करत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करून नकाशे मंजूर करण्यासाठी फार वेळ लागत होता. त्यामुळे ही प्रक्रिया ऑनलाईन करावी, अशी मागणी केली जात होती. ती मागणी 2021 साली मंजूर करण्यात आली, परंतु काही तांत्रिक कारणामुळे या प्रक्रियेत अडथळे येत होते. ते सर्व अडथळे पार करून महापालिकेने आत महापालिका स्तरावर सर्व नकाशे ऑनलाईन स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेत कागदपत्रे तपासणी अतिशय जलद गतीने केली जाणार आहे. विकासकांनी परिपूर्ण कागदपत्रे सादर केली तर अवघ्या तीन ते चार महिन्यांत इमारतीचे नकाशे मंजूर करणे शक्य होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ऑनलाईनच प्रस्ताव स्वीकारण्याचे सक्त आदेश दिले आहेत, त्यामुळे परिपूर्ण कागदपत्रे असतील तरच प्रस्ताव स्वीकारला जाणार आहे, यामुळे अधिकाऱ्यांचा वेळ देखिल वाचणार आहे तसेच काम देखिल जलद गतीने होईल, असे शहर विकास विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
ठाणे महापालिकेत आत्तापर्यंत १००५ नकाशे विकासकांनी सादर केले आहेत. त्यापैकी ७५६ नकाशे मंजूर करण्यात आले असून उर्वरित नकाशे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत तर राज्यातील सुमारे 23 हजार नकाशे ऑनलाईन सादर करण्यात आले आहेत.