मेक्सिकन फूडमध्ये मेक्सिकोच्या पाककृती आणि परंपरांचा समावेश आहे. या पदार्थातील घटक आणि पद्धती ओल्मेक आणि माया या पहिल्या कृषी समुदायापासून सुरू झाल्या, ज्यांनी मक्याचे उत्पादन केले. आजच्या मेक्सिकन मूळ खाद्यपदार्थांमध्ये कॉर्न (मका), टर्की, बीन्स, स्क्वॅश, राजगिरा, चिया, एवोकॅडो, टोमॅटो, कोकाओ, व्हॅनिला, ॲगवेव्ह, स्पिरुलिना, रताळे, कॅक्टस आणि मिरचीचा समावेश आहे. त्याच्या शतकानुशतके इतिहासाचा परिणाम स्थानिक परिस्थितीवर आधारित प्रादेशिक पाककृतींमध्ये झाला आहे, ज्यात बाजा मेड, चियापास, वेराक्रूझ, ओक्साकन आणि न्यू मेक्सिकन आणि टेक्स-मेक्स या अमेरिकन पाककृतींचा समावेश आहे.
मेक्सिकन पाककृती ही मेक्सिकोची संस्कृती, सामाजिक रचना आणि लोकप्रिय परंपरा यांचा एक महत्वाचा पैलू आहे. मेक्सिकन पाककृतीमध्ये भाज्या महत्त्वाची भूमिका बजावतात. भाज्यांमध्ये झुचीनी, फ्लॉवर, कॉर्न, बटाटे, पालक, स्विस चार्ड, मशरूम, जिटोमेट (लाल टोमॅटो) आणि हिरवे टोमॅटो यांचा समावेश होतो. इतर पारंपारिक भाजीपाला घटकांमध्ये मिरची, हुइटलाकोचे (कॉर्न फंगस), ह्युझॉन्टल आणि नोपल (कॅक्टस पॅड) यांचा समावेश होतो.
मेक्सिकन फूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर ठाण्यातील या रेस्टॉरंट्सला नक्की भेट द्या.
कात्सु कट्टा
कात्सु कट्टा हे फ्युजन फूड आउटलेट २०२२ मध्ये ठाण्यातील एका तरुणाने सुरु केले. येथे फ्युजन फूडसोबतच मेक्सिकन फूडचा आस्वाद खवय्यांना घेता येईल. सुरुवातीला मेक्सिकन फूड हे काहीतरी नवीनच असल्यामुळे कात्सु कट्टाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि त्यामुळे रेस्टॉरंटची प्रसिद्धीही झाली. अनेकांपर्यंत कात्सु कट्टाचे नाव पोहोचले. येथे सर्वात जास्त टाकोस प्रसिद्ध आहेत जे मेक्सिकन आणि जॅपनीज मिक्स करून तयार केले जाते. टाकोस, सलाड, नाचोस हे मेक्सिकन पदार्थ कात्सु कट्टा येथे उपलब्ध आहेत. मेक्सिकन पदार्थ तयार करायला वेळ कमी लागतो त्यामुळे ऑर्डर दिल्यापासून १५ मिनिटात पदार्थ तयार होतो. जे कात्सु कट्टामध्ये पहिल्यांदाच येतात त्यांना चिकन टाकोस आणि चिकन कार्ड्स यासारख्या डिश खायचा सल्ला देतो, असे कात्सु कट्टाचे रोहिल मोहिले यांनी सांगितले. येथे पदार्थ बनवण्याची तयारी आधीच केलेली असते, त्यामुळे ऑर्डर आल्यावर सहज १० मिनिटात ग्राहकांची मागणी पूर्ण केली जातो. रेडी टू इट मुळे हल्ली सगळ्यांना झटपट पदार्थ हवे असतात त्यामुळे या मेक्सिकन फूडला तरुणांची पसंती असल्याचे रोहिल मोहिले यांनी सांगितले.
पत्ता : जनार्दन स्मृती, चेंदणी बंदर रोड, सिडको बस स्टॉप जवळ, कोळीवाडा, ठाणे, 400601
New York Burrito Company रेस्टॉरंट
सहा वर्षांपूर्वी सुरु झालेले New York Burrito Company रेस्टॉरंट मेक्सिकन फूड लव्हर्ससाठी प्रसिद्ध आहे. या रेस्टॉरंटमध्ये मेक्सिकन फूड प्रोफेशनल शेफकडून बनवले जाते. त्यामुळे खवय्यांना मेक्सिकन फूडची योग्य चव येथे चाखायला मिळते. त्यामुळे या रेस्टॉरंटला खवय्यांचा पुरेपूर प्रतिसाद मिळतो. या रेस्टॉरंटमध्ये टॅकोस, बुरिटोस आणि क्वेसडिलास या सर्वोत्तम मेक्सिकन डिशेस उपलब्ध आहेत. सोबतच हेल्दी डिशेसमध्ये गुआकामोले, सॅलड्स आणि फाजितास या डिशेसचा समावेश आहे. या रेस्टॉरंटला पहिल्यांदाच भेट देणाऱ्या मेक्सिकन फूड लव्हर्सला बुरिटो बोल हा पदार्थ New York Burrito company रेस्टॉरंटतर्फे सुचवला जातो. New York Burrito Company रेस्टॉरंटचे मुंबईत एकूण १५ आउटलेट आहेत. एअरपोर्टवर चार वेगवेगळ्या ठिकाणी त्याचप्रमाणे गिरगाव चौपाटी, जुहू, माटुंगा, घाटकोपर, विवियाना मॉल, लोअर परेल, महावीर नगर, ओशिवरा, वांद्रे, विलेपार्ले, ओबेरॉय मॉल येथे या रेस्टॉरंटचे आउटलेट आहेत.
पत्ता : विवियाना मॉल, ठाणे – ४००६०६
मेझ मेक्सिकन किचन
मेझ मेक्सिकन किचन ताज्या आणि अस्सल मॅक्सिकन पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. हे रेस्टॉरंट २०१७ मध्ये वीर भारतीय यांनी साऊथ बॉम्बेमध्ये लहान पॉप-अप म्हणून सुरु केले. वीर यांना लॉस एंजेलिसमध्ये असताना वाजवी दरात उच्च-गुणवत्तेचे, ताजे खाद्यपदार्थ देणारे जलद सेवा रेस्टॉरंट आवडले, त्यामुळे त्यांना असे रेस्टॉरंट मुंबईत सुरु करण्याची कल्पना सुचली. मुंबईला मेक्सिकन खाद्यपदार्थांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने मेझ मेक्सिकन किचन सुरु झाले. या रेस्टॉरंटमध्ये मायक्रोवेव्ह वापरत नाही, उत्तम फ्लेवर्स आणण्यासाठी ग्रिलवर मंद आचेवर पदार्थ करण्याकडे प्राधान्य दिले जाते. मेझ मध्ये अगदी ७ मिनिटात मेक्सिकन पदार्थ तयार केला जातो. दर्जेदार आणि जलद सेवेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ते मुंबईच्या खाद्यप्रेमींमध्ये लोकप्रिय झाले आहे, असे वीर यांनी सांगितले. मुंबईत प्रीमियम पण परवडणाऱ्या मेक्सिकन फूडचा आस्वाद खवय्यांना घेता यावा या वीर यांच्या इच्छेमुळे मेझला मेक्सिकन फूडप्रेमींची सर्वोच्च पसंती मिळते.
पत्ता : शॉप नं. ६,७ , भक्ती मंदिर, पाच पाखाडी, ठाणे – ४००६०२