ठाणे: सन २०२४-२५ या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी या पूर्वी दि. १७ एप्रिल पासून ते १० मेपर्यंत बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे आरटीई अंतर्गत नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण ६३८ पात्र शाळा असून एकूण ११,३०९ रिक्त जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी १७ ते ३१ मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी)(१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येणार आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाईन पदधतीने केलेल्या अर्जाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) कडून करण्यात येत आहे.
या प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या (वंचित गट- एससी/एसटी/एनटी/व्हीजे/ओबीसी/एसबीसी, दुर्बल गट-१ लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग-बालकाचे ४०टक्के अपंगत्व, एच.आय.व्ही. बाधित किंवा एच.आय.व्ही प्रभावित बालके, अनाथ बालके) जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश प्रकियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा. आरटीई 25टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या वेबसाईट वर पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.